सातारा : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सातार्यातील छत्रपती शाहू चौकात शनिवारी सकाळपासून जनसागर उसळला होता. नगरपालिकेसमोरील उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, घोषणा देण्यात आल्या. महापरिनिर्वाण दिनानिमित्त छ. शाहू चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शनिवारी सकाळपासून गर्दी झाली होती. समता सैनिक दलाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. बौद्ध धम्मानुसार प्रार्थना म्हणून डॉ. बाबासाहेबांना आदराजंली वाहण्यात आली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी ‘बाबासाहेबांचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. यानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान करून, सामाजिक बांधिलकी जपत डॉ. बाबासाहेबांना अनोखे अभिवादन केले. याठिकाणी आलेल्या लोकांना फळे व खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. उद्यान परिसरात पुस्तकांचे स्टॉलही लावण्यात आले होते. तेथे पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. पोलिसांनी शाहू चौकात चोख बंदोबस्त ठेवला होता. सार्वजानिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. डॉ. बाबासाहेबांनी समता, बंधुता व स्वातंत्र्याची शिकवण दिली. त्यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेमुळे सर्व नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळाले आहेत. सदरबझार येथील आमणे बंगल्याच्या जागेत डॉ. बाबासाहेबांचे स्मारक होणार आहे. त्यासाठी योग्य पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारणे, हे आमचे कर्तव्य आहे. या जागेबाबत आमणे कुटुंबीयांशी चर्चा सुरू आहे. या कुटुंबाला शासनाकडून जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. यावेळी रिपाइं (ए) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मातंग आघाडीचे अण्णा वायदंडे, माजी नगरसेवक अमोल मोहिते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.