नसरापूर : कोंढणपूर फाटा (ता. हवेली) येथे गाडी लावण्याच्या किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी होऊन पुण्यातील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, राजगड पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. गुरुवारी (दि. १० जुलै) संध्याकाळी साडेसहा वाजता खेड-शिवापूर येथील राधाकृष्ण हार्डवेअर दुकानासमोर अर्जुन रजपूत (रा. शिवापूर) याने दुचाकी उभी केल्यावर मंथन वाडकर (रा. कोंढणपूर फाटा) याच्याशी वाद झाला. मंथनने गाडी लाथ मारून पाडल्याचा आरोप अर्जुनने केला. त्यानंतर मंथन, लोकेश, अदिनाथ वाडकर आणि चार अनोळखी व्यक्तींनी अर्जुनवर दांडके, खुर्ची आणि हाताने मारहाण केली. तसेच, “तुला आणि तुझ्या खानदानाला संपवीन,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दुसऱ्या दिवशी (दि. ११ जुलै) अर्जुन आणि त्याच्या नातेवाइकांनी मंथनच्या घरी जाऊन अदिनाथ आणि लोकेश वाडकर यांना मारहाण केली. घरातील वस्तूंचे नुकसान करून शिवीगाळ केली. यात लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तो आयसीयूत आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी गुन्हे क्रमांक २६९/२०२५ आणि २७०/२०२५ दाखल केले आहेत. पहिल्या घटनेनंतर तात्काळ कारवाई झाली असती तर दुसरी घटना टाळता आली असती, अशी स्थानिकांची चर्चा आहे. तपासाधिकारी पो. ना. मिस्त्री यांनी सांगितले, “पहिल्या प्रकरणात कायदेशीर अटक शक्य नव्हती, पण दुसऱ्या घटनेतील गंभीर दुखापतीमुळे कठोर कारवाई होईल.” पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.