जिनिव्हा – जगभर भयानक साथ पसरवणाऱ्या करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली, या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांनी केलेल्या अभ्यास, सर्वेक्षणाचा अहवाल पुढच्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विषाणूचे उगमस्थान शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांसह काही त्रयस्थ तज्ञांचे पथक अलिकडेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते.
या पथकाने वुहान प्रांतातील सर्वाधिक संसर्ग असलेल्या भागांना भेट देऊन निरीक्षणे नोंदवली होती. तसेच वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीलाही या पथकाने भेट दिली होती आणि करोना विषाणूचा प्रादुर्भाव या इन्स्टिट्युटच्या प्रयोगशाळेतूनच झाला होता का, याचीही तपासणी केली होती. चीनमधील मत्स्य बाजारातही या पथकाने निरीक्षण केले होते. आता करोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतचा या पथकाचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात “डब्लूएचओ’ला सादर केला जाईल, असे “डब्लूएचओ’चे प्रवक्ते ख्रिस्चियन लिंडमेयर यांनी सांगितले. हा अहवाल या आठवड्यात सादर केला जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगण्यात आले होते.