– राजाभाऊ चव्हाण बहुतांचे हित साधण्यासाठी आयुष्य वेचलेले प्रा. भाऊसाहेब जाधव अमृत महोत्सव वर्षात पदार्पण करत आहेत. भाऊसाहेबांविषयी लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न. देश आणि समाज बदलण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असल्यास समाजसेवक म्हणूनच कार्य करायला हवं, असं काही नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, त्या क्षेत्रात प्रामाणिक कार्य केल्यास पदरी कायम उपेक्षाच पडलेल्यांनाही मुख्य प्रवाहात आणता येते. प्रा. भाऊसाहेब जाधवांचा आजवरचा प्रवास हेच अधोरेखित करतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलेल्या भाऊसाहेब जाधव यांनी ‘आपणही या समाजाचे देणे लागतो’ या विचारातून शिक्षण क्षेत्रात उभारलेलं कार्य वाखाणण्याजोगं तर आहेच, पण त्यासोबतच इतरांसाठी प्रेरणादायी असंही आहे. मराठवाडा मित्र मंडळ शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष असलेले भाऊसाहेब जाधव अगदी सुरुवातीच्या काळातच संस्थेसोबत जोडले गेले. अनेक नामांकित शिक्षणसंस्था आजूबाजूला असतानाही भाऊसाहेब जाधव यांनी, मराठवाडा मित्र मंडळाची वेगळी ओळख निर्माण केली. संस्था नावारूपाला आल्यानंतरही भाऊसाहेबांनी “बहुतांचे हित’ साधण्याचा उद्देश मात्र आजही कायम ठेवला आहे. यातूनच मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाच्या सुविधेचा विस्तार, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत, विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत अशा अनेक कामांमध्ये भाऊसाहेबांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, ते कमालीचे प्रसिद्धी पराङ्मुख आहेत. त्यामुळेच भाऊसाहेबांना शब्दांत लिहिणे सोपे नाही. “दिशा परिवार’ सारख्या संस्थांच्या माध्यमातून शेकडो गरजू व गरीब गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाऊसाहेब आधारवड आहेत. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संस्थांची अडचण ओळखून मदतीचा हातभार लावायचा. मात्र, केलेल्या मदतीची कोठेही वाच्यता करायची नाही हे तत्त्व भाऊसाहेब आजही पाळतात. भाऊसाहेब विद्यार्थ्यांना आपलेसे वाटतात. त्यांच्या कार्यालयात, त्यांच्या खुर्चीसमोर बसून आपली समस्या सांगताना विद्यार्थ्यांना संकोच वाटत नाही. विद्यार्थ्यांना संवादातून आपलंसं करून घेणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्यांना प्रेरित करणं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करणं, ही भाऊसाहेबांच्या कामाची पद्धत. अडथळ्यांना कंटाळून शिक्षण अर्ध्यावर सोडण्याच्या विचारात असलेले अनेक विद्यार्थी, भाऊसाहेबांचे मार्गदर्शन व मदतीमुळे आज चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, तुकडोजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यानेच भाऊसाहेबांना, वंचित व सामाजिक व्यवस्थेचे बळी ठरलेल्यांना आपल्या लक्ष्यापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचवण्यात मदत करता आली.स्वातंत्र्य पूर्व काळात समाजसुधारक, लोक नेते हे शिकलेले कमी होते; परंतु शहाणे होते. आज शिकलेले समाजसुधारक नेते दिसतात; पण समाजाच्या व्यथा, व्यवस्था बदल घडवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग कमी दिसतो. समाज आत्मकेंद्रित झाला आहे. “मी’, “माझ्या’ पलीकडे विचार करत नाही, अशाही परिस्थितीत प्रा. भाऊसाहेब यांच्यासारखे सामाजिक बांधिलकी जपणारे आशेचा किरण आहेत. शिक्षण क्षेत्रात 50 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, शिक्षण क्षेत्रातील बदलांचे साक्षीदार असलेल्या भाऊसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा, अनुभवाचा उपयोग शासनाने शिक्षण व्यवस्थेत करून घ्यायला हवा. अशा अनेक कर्तृत्ववान भाऊसाहेबांची खरं तर समाजाला गरज आहे. आज (शनिवार, दि 4 नोव्हेंबर) प्रा. भाऊसाहेब जाधव यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा मित्र मंडळ कर्मचारी व अनेक सामाजिक संस्था त्यांचा सत्कार आयोजित करत आहेत. भाऊसाहेब जाधव यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा, यापुढेही गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना ऊर्जा मिळो!