Jejuri : तब्बल १९ तास रंगला मर्दानी मराठमोळा दसरा; भांडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतषबाजी अन् आरशातून देवभेट
Jejuri : सालाबादप्रमाणे मंगळवारी (दि. २०) समस्त पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ मानकरी यांचे हस्ते देवांचे घट उठवण्यात आले. त्यानंतर देवसंस्थानचे विश्वस्त, कर्मचारी-अधिकारी, तसेच मानकरी यांच्या वतीने ध्वज फडकवत पूजन, नगारा, शस्त्र, खंडा पूजन करण्यात आले.

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून गणल्या गेलेल्या खंडेरायाच्या धार्मिक राजधानी असलेल्या जेजुरी नगरीचा मर्दानी मराठमोळा दसरा त्याच्या साजऱ्या गोजऱ्या नावाप्रमाणे साजरा करण्यात आला. खंडेरायाच्या वर्षातून आठ ते दहा यात्रा जत्रा पैकी दसरा उत्सव हा सर्वात मोठा मानापानाचा सण समजला जातो. उत्सवांमध्ये नगरीतील सर्व जातीधर्मातील समाजबांधवांना मान पान आहेत.
उदरनिर्वाह व नोकरीनिमित्त गेलेला जेजुरीकर उत्सवासाठी जेजुरीत दाखल होत असतो. गडकोट आवाराला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, जयाद्री डोंगर रांगेच्या कुशीत फटाक्यांच्या आतषबाजीत होणारा देवभेट सोहळा, आपटापूजन, सोने लुटणे, नगरप्रदक्षिणा, लोकर उधळण, पारंपरिक लोकगीते, सनईचा मंगलमय सूर आणि ऐतिहासिक खंडास्पर्धा या विधींमुळे या सणाला मर्दानी मराठमोळा दसरा हे नाव प्रचलित झाले आहे .
सालाबादप्रमाणे मंगळवारी (दि. २०) समस्त पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ मानकरी यांचे हस्ते देवांचे घट उठवण्यात आले. त्यानंतर देवसंस्थानचे विश्वस्त, कर्मचारी-अधिकारी, तसेच मानकरी यांच्या वतीने ध्वज फडकवत पूजन, नगारा, शस्त्र, खंडा पूजन करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने गडकोट आवारातील मुख्य सदरे वरून मुख्य मानकरी पेशवे, खोमणेपाटील, माळवदकरपाटील, यांनी इशारा करताच घडशी समाज बांधवांच्या सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात कुलदैवत खंडेरायाच्या पालखी सोहळ्याने देवभेट, नगरप्रदक्षिणेसाठी गडकोट आवारातून प्रस्थान ठेवले.
कड्यावर अन् दरीत आरशातून ‘देवभेट’
रात्री ९ वाजेच्या सुमारास खंडेरायाचे मूळ स्थान असलेल्या कडेपठारच्या दिशेने पालखी सोहळा मार्गस्थ झाला. रात्री १२ वाजता कडेपठार येथील आपट्याच्या झाडाला मूर्तींनी स्पर्श करताच ग्रामस्थांनी शिलंगणाचे सोने लुटले. त्यानंतर रात्री १ ते २:३० दरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीत रमणा दरीमध्ये दोन्ही पालख्यांचा अभूतपूर्व भेटाभेट सोहळा रंगला. कडेपठारचा पालखी सोहळा ८०० फूट उंच कड्यावर, तर गडकोटचा पालखी सोहळा डोंगरदरीमध्ये असताना आरशाच्या माध्यमातून ही भेट घडवून आणली जाते. यात राऊत-नाभिक व राऊत-परीट बांधवांना मानाचे स्थान असते.
सकाळी ८ वाजता पालखी गडकोटात विसावली
कडेपठार खंडेरायाची पालखी परतीकडे मार्गस्थ झाल्यानंतर पेशवे तलावालगत आपट्याचे सोने लुटण्यात आले. जुनी जेजुरी, रोकडोबा मंदिर, मुख्य नगरपालिका चौक व जामा मशिदीसमोर पानांचा विडा स्वीकारत मुख्य महाद्वार मार्गे पालखी सोहळा सकाळी ८ वाजता गडकोटात दाखल झाला. या वेळी धनगर समाज बांधवांकडून लोकरीची उधळण करीत सुंबरान मांडण्यात आले. त्यानंतर पार पडलेल्या ऐतिहासिक खंडा स्पर्धेत विजेत्यांचा व सेवेकऱ्यांचा देवसंस्थानतर्फे सन्मान करण्यात आला.
मानकरी व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
देवसंस्थानच्या वतीने कर्मचारी सुनील देशमाने यांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडत सलामी दिली. यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त विश्वास पानसे, विश्वस्त मंगेश घोणे, अभिजित देवकाते, अनिल सौन्दडे, पोपट खोमणे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, नगरसेवक पै. कृष्णा कुदळे, छबन कुदळे, दत्ता सकट, खंडू भालेराव, गणेश आगलावे, सुशील राऊत, शैलेश राऊत, दीपक राऊत, ओंकार झगडे, खोमणे पाटील माळवदकर पाटील, मुलाणी, खान (घोडेवाले मानकरी ) खोमणे, हरपळे, शेवाळे, चव्हाण, सकट, दोडके, भालेराव, डीखळे, मोरे, कदम, बारभाई, सातभाई, दिडभाई, लांघी, राऊत, आगलावे, निरगुडे, सोनवणे ,महाजन, वीरकर, केंजळे, जगताप, उबाळे, बारसुडे, झगडे, कुदळे, अत्रे, पेशवे, दरेकर, बेलसरे, खाडे, जाधव, निकुडे, कांबळे, जोशी, निरगुडे, शिंदे जाधव, लाखे, बयास, आदींसह सर्व मानकरी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





