पिंपरी – तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांच्या कार्यालयावर चढून एका व्यक्तीने धिंगाणा घातला. तसेच अनेक वाहनांची तोडफोड केली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याला खाली उतरविण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि.1) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. ती व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी एक व्यक्ती तळेगाव दाभाडे वाहतूक पोलिसांच्या कार्यालयावर चढली. त्या व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर विटा फेकून मारल्या. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, आपदा मित्र यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचे प्रयत्न करण्यात आले. तब्बल दोन तास हा प्रकार सुरू होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा मारून त्यास खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. दोन तासानंतर त्या व्यक्तीस खाली उतरविण्यात यश आले. तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यास तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.