पुणे | कचरा वेचकांच्या मुलांची दमदार कामगिरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कचरा वेचणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मुलांनी अनेक अडथळे व अडचणींचा सामना करत इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केले. कमीत कमी संसाधनातही, खडतर कष्ट आणि जिद्द यांमुळे स्वप्न साकार करू शकतो, हे या मुलांनी निकालातून अधोरेखित केले आहे. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतमधील सदस्यांच्या मुलांचे दहावी परीक्षेतील हे यश निश्चितच वाखणण्याजोगे आहे.
येरवडयातील गांधीनगरमधील गुनश्री शिंदे हिला ९२ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील महेश शिंदे हे कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संस्थेचे सभासद आहेत. आर्थिक अडचण असल्याने कुठलाही क्लास लावला नव्हता. घरातील परिस्थिती सांभाळून अंकिता व गुनश्री या दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत.
आई घरकाम करते. गुनश्री हिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. ती विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून, संघटनेने शिक्षणासाठी मदत केली आहे. तशी भविष्यात पण करावी, अशी गुनश्रीच्या वडिलांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पानमळा येथील शौर्या बनसोडे हिने ९१.६० टक्के गुण मिळविले आहेत. सुवर्णा बनसोडे या अनेक वर्षांपासून कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत संस्थेच्या सभासद आहेत. त्यांची मुलगी शौर्याने परिस्थिती अतिशय बिकट परिस्थितीवर मात करून हे यश संपादित केले आहे. शौर्याचे वडील ऑफिस बॉय म्हणून कामाला आहेत. शौर्याचे स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
शंकर कांबळे आणि अर्चना कांबळे हे १० वर्षांपासून स्वच्छ संस्थेमध्ये हडपसर भागात कचरा घेण्याचे काम करतात. त्यांची मुलगी संध्या कांबळे हिने यावर्षी १० वी परीक्षेत ८२.२० टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे.
संध्याचा अभ्यास तिने स्वतः व तिची बहीण साक्षीच्या मदतीने पूर्ण केला आहे. आई, वडील काम करतील, तरच आमचे शिक्षण पूर्ण होऊ शकते, असे संध्याने सांगितले. तिला भविष्यात पोलीस व्हायचे आहे. त्या अनुषंगाने संध्या आर्ट्स किंवा कॉमर्स शाखेत प्रवेश घेणार आहे.
पूनम लांडगे यांचा मुलगा कृष्णा लांडगे याला चौथीपासूनच संधिवातासारखा आजार आहे. या परिस्थितीत त्याने दहावीची परीक्षा देऊन ५७.४० टक्के गुण मिळविले आहेत. कृष्णाचे वडील त्याला परीक्षा केंद्रापर्यंत स्वतः घेऊन जात असत.
पूनम लांडगे या स्वच्छ सहकारी संस्थेच्या सदस्य आहेत आणि सदाशिव पेठेत परिसरात कचरा गोळा करतात. वडील सिंहगड कॉलेजमध्ये सफाई कामगार म्हणून काम करतात. कृष्णाचे पुढे विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न आहे.




