बामको, (माली) : मालीजवळ एक प्रवासी बोट बुडून झालेल्या दुर्घटनेमध्ये डझनभर लोकांना जलसमाधी मिळाली आहे. ही बोट मालीच्या उत्तरेकडील टिंमबकटू प्रांतातील निगेर नदीच्या काठाला येण्याचा प्रयत्न करत असताना एका खडकावर आपटली आणि बुडाली. बोटीतील डझनभर लोक बुडून मरण पावले, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी आणि मृतांच्या नेतावाईकांनी सांगितले. हा अपघात गुरुवारी दिर नावाच्या गावाजवळ घडला होता, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. अद्याप या दुर्घटनेतील मृतांचा अधिकृत आकडा प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. मात्र प्रांतातील रहिवासी आणि नॅशनल असेंब्लीतील माजी नेते अलकायदी टूर यांनी एकूण ३८ जण मरण पावले आणि २३ जण बचावले असल्याचे म्हटले आहे. दिर गावच्या एका रहिवाशांच्या कुटुंबातील किमान २१ जण या दुर्घटनेमध्ये मरण पावले आहेत. या सर्वांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. सरकारी मदत एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सर्वांचा शोध घेतला जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या बोटीमधून भातशेती करणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना नेले जात होते. रात्रीच्यावेळी अल-कायदाशी संबंधित दहशतवादी गटांच्या हल्ल्यांचा धोका असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गोदीमध्ये बोटी लावण्यास मनाई आहे. पण बोट चालकाला सकाळपर्यंत वाट बघत थांबायचे नव्हते. त्यामुळे त्याने दुसऱ्या ठिकाणी बोट किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र बोट खडकावर आपटल्यामुळे फुटली आणि सर्व प्रवासी पाण्यात पडले.