श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील एनआयए विशेष न्यायालयाने शनिवारी पाकिस्तानस्थित हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख मोहम्मद युसूफ शाह उर्फ सय्यद सलाहुद्दीन याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले असून त्याला अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. एनआयए कायद्यांतर्गत नियुक्त विशेष न्यायाधीशांसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने तपास यंत्रणेकडे आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे नमूद केले. न्यायालयाने सांगितले की, आरोपीवर कलम १३, १८, २० आणि ३९ अंतर्गत दहशतवादी कट, कारवायांमध्ये सहभाग आणि देशाच्या सार्वभौमत्वाला धोका असे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यानूसार न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. सन १९९३ मध्ये पाकिस्तानात पळून गेलेला सलाहुद्दीन सध्या तेथून दहशतवादी कारवाया चालवत असून तो युनायटेड जिहाद कौन्सिलचा प्रमुख आहे. केंद्र सरकारने २०२० मध्ये त्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. एनआयएने २०२३ मध्ये सलाहुद्दीन आणि त्याच्या दोन मुलांशी संबंधित मालमत्ता जप्त केली होती, तर दहशतवादी फंडिंग प्रकरणात अटकेनंतर त्याच्या मुलांना २०२१ मध्ये सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.