Mumbai rain update | सरत्या वर्षाला निरोप देत 2026 या नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. पण ऐन थंडीच्या वातावरणाता वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना सरप्राईज मिळाले. पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने भल्या सकाळी ऑफिस आणि कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. सीएसएमटी, कुर्ला, भांडूप, विक्रोळी, सायन, विद्याविहार, दादर, प्रभदेवी, लोअर परळ, अंधेरीसह संपूर्ण मुंबईमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली. दरम्यान, मुंबईत पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. पावसामुळे वातावरणात बदल झाला असून थंडीचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह पालघर आणि नाशिकमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पहाटे पाच वाजल्यापासून पावसाचे ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. मुंबईसह पालघर आणि नाशिकच्या काही भागात पावसाचे ढग दाटले आहेत. या तिन्ही जिल्ह्यात पुढील काही तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी पुढील चार दिवस थंडी कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. हेही वाचा: JEE-NEET Exam: आता परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक हजेरी; एनटीएचा पारदर्शकतेसाठी मोठा निर्णय