नवी दिल्ली: भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात (Aviation Sector) लवकरच मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. केंद्र सरकारने तीन नवीन एअरलाईन्सना देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासाठी परवानगी दिली असून, यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नवीन आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाने ‘अल हिंद एअर’ (Al Hind Air) आणि ‘फ्लायएक्सप्रेस’ (FlyExpress) यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) जारी केले आहे. २०२६ पर्यंत विमान सेवा सुरू होण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या दोन्ही कंपन्यांसह उत्तर प्रदेशातील ‘शंख एअर’ (Shankh Air) देखील २०२६ मध्ये आपले कमर्शियल ऑपरेशन्स सुरू करू शकते. ‘शंख एअर’कडे यापूर्वीच एनओसी उपलब्ध आहे. केरळच्या ‘अलहिंद ग्रुप’कडून ‘अल हिंद एअर’चे प्रवर्तन केले जात आहे, तर ‘फ्लायएक्सप्रेस’च्या प्रवर्तकांबाबतची सविस्तर माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘डुओपॉली’ला मिळणार आव्हान सध्या भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेच्या सुमारे ९०% हिश्श्यावर इंडिगो आणि एअर इंडिया समूहाचे वर्चस्व आहे. एकट्या इंडिगोचा बाजारपेठेतील हिस्सा ६५% पेक्षा जास्त आहे. या दोन बड्या कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे (Duopoly) प्रवाशांना अनेकदा मर्यादित पर्यायांचा सामना करावा लागतो. नव्या कंपन्यांच्या एन्ट्रीमुळे ही मक्तेदारी मोडीत निघेल आणि निकोप स्पर्धेमुळे प्रवाशांना चांगल्या सेवा व किफायतशीर तिकीट दर मिळण्याची शक्यता आहे. क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत गेल्या काही वर्षांत ‘गो फर्स्ट’ आणि ‘जेट एअरवेज’ सारख्या कंपन्या आर्थिक संकटामुळे बंद पडल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, आता नवीन खेळाडू मैदानात उतरल्याने विमान वाहतूक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी देशात विमान ऑपरेटरची संख्या वाढवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आहेत तर इतर शेड्यूल्ड एअरलाईन्समध्ये अकासा एअर, स्पाइसजेट, अलायन्स एअर, स्टार एअर, फ्लाय९१, इंडिया वन एअर यांचा समावेश आहे.