Pimpri : प्रत्येक घरातून नवे डॉ. कलाम घडले पाहिजे : आमदार थोरवे

कर्जत : ग्रामीण भागातील विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. मोबाईलपेक्षा संगणकाचा वापर करा आणि डिजिटल शिक्षणाचा लाभ घेत प्रत्येक घरातून नवा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम घडवा, असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, कळंब (कर्जत) येथे मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता आमदार थोरवे यांच्या हस्ते अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा (ई-लर्निंग क्लासरूम) चे उद्घाटन पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्रयोगशाळा व क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा आमदारांनी केली.
कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे, केंद्रप्रमुख माधुरी पाटील, मुख्याध्यापक एच. के. लोहकरे, जिल्हा परिषद कमिटी अध्यक्ष रविंद्र बदे, विधानसभा संघटक शिवराम बदे, माजी सभापती राहुल विशे, सरपंच प्रमोद कोंडिलकर यांच्यासह मान्यवर, ग्रामस्थ व शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर आमदारांचे स्वागत केले. तर विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून ‘पहलगाम हादसा’ आणि ‘मिशन सिंदूर’चे सादरीकरण केले. तसेच गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांचा आमदार थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.





