कोलकत्ता – कमी मूल्याच्या नोटाचा देशभर मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि छोट्या उद्योगांना व्यवहार करताना अडचणी येत आहेत असे ऑल इंडिया रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे. हा प्रश्न लवकर सोडविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. या संघटनेतर्फे रिझर्व बँकेला एक पत्र पाठविण्यात आलेले आहे. या पत्रात म्हटले आहे की, दहा रुपये, वीस रुपये आणि 50 रुपयांच्या नोटा देशातील अनेक भागात कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये या नोटांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना आणि छोट्या व्यवसायिकांना व्यवहार पूर्ण करणे अवघड झाले आहे. हा प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. जास्त मुलाच्या नोटा म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपये आणि पाचशे रुपयांच्या नोटा देशाच्या विविध भागात आवश्यक इतक्या उपलब्ध आहेत. एटीएममधून ह्या नोटा उपलब्ध होतात. मात्र एटीएममधून कमी मूल्याच्या नोटा कमी प्रमाणात उपलब्ध होतात आणि बँकांमधून या नोटा ग्राहकांना उपलब्ध केल्या जात नसल्याचे निरीक्षण या संघटनेने नोंदविले आहे. रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी रबी शंकर यांना पाठविलेल्या पत्रात या संघटनेने म्हटले आहे की, ग्रामीण भागात नागरिकांना वाहतूक, किराणा इत्यादीचे व्यवहार करणे कमी मूल्याच्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे जवळजवळ अशक्य झाले आहे. डिजिटल व्यवहारांना चालना मिळत असली तरी नोटांचा वापर वाढत असल्याच्या बाबीकडे ही या संघटनेने लक्ष वेधले आहे. आपल्या छोट्य व्यवहारासाठी ग्रामीण भागातील लोक अजूनही छोट्या मूल्याच्या नोटांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र त्यांनाच नोटा उपलब्ध नसल्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे. यातून मार्ग काढण्याची गरज आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रिझर्व बँक नाण्यांचा पुरवठा वाढवीत आहे. मात्र तरीही ही मागणी पूर्ण होत असल्याचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत रिझर्व बँकेने व्यावसायिक बँकांच्या माध्यमातून कमी मूल्याच्या नोटाचा पुरवठा वाढविण्याची गरज आहे. नाण्यांच्या पुरवठ्यासाठी ग्रामीण भागात ग्रामपंचायत, सहकारी संस्था, विभागीय ग्रामीण बँका आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पुरवठा वाढविण्याची गरज आहे.