प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक १७ मधील मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब भोईर आणि भाजपचे नामदेव ढाके यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत पहायला मिळाली. प्रत्येक फेरीत मतांचे गणित बदलत राहिल्याने दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात होते. त्यामुळे काही काळ मतमोजणी केंद्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सोळाव्या फेरीदरम्यान आपलाच उमेदवार विजयी झाल्याचा दावा दोन्ही बाजूंचे समर्थक करीत होते. मात्र दोन्ही पक्षांचे उमेदवार स्वतः मतमोजणी केंद्रात ठाण मांडून आकडेमोड करीत होते. अखेर नामदेव ढाके यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी आपल्या समर्थकांसह मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.दरम्यान, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शेखर चिंचवडे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. ते मोठ्या फरकाने विजयी होतील, असा अंदाज त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला होता. मात्र काही फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन चिंचवडे यांनी शेखर चिंचवडे यांचे मताधिक्य कमी करण्यात यश मिळविले. तथापि, भाजपच्या महिला उमेदवार पल्लवी वाल्हेकर आणि आशा सूर्यवंशी यांनी सुरुवातीपासून घेतलेले मताधिक्य अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवले.मात्र खरी चुरस भाऊसाहेब भोईर आणि नामदेव ढाके यांच्यातच पाहायला मिळाली. कधी ढाके अल्प मतांनी आघाडी घेत होते, तर कधी भोईर मताधिक्य मिळवत होते. पंधराव्या फेरीअखेर आपल्याकडे सुमारे ३५० मतांची आघाडी असल्याचा दावा ढाके यांनी केला होता. अखेरच्या फेरीत दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी पुन्हा एकदा आकडेमोड करत आपलाच उमेदवार विजयी असल्याचे सांगितले. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी दोन्ही बाजूंच्या समर्थकांना पुन्हा आकडे तपासण्याचे आवाहन केले. त्यानंतर झालेल्या अंतिम आकडेमोडीत भाऊसाहेब भोईर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नामदेव ढाके आणि त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्रातून माघार घेतली. पूर्वीची आठवण ताजी या घटनेने चिंचवड परिसरातील एका जुन्या मतमोजणीचा प्रसंग नागरिकांच्या स्मरणात आला. त्या वेळी शमीम पठाण आणि मोना कुलकर्णी यांच्यात लढत झाली होती. आपला विजय झाल्याच्या समजुतीने मोना कुलकर्णी यांनी विजयी मिरवणूक काढली होती. मात्र नंतर झालेल्या तपासणीत अंतिम निकाल जाहीर झालेला नसल्याचे स्पष्ट झाले.निवडणूक विभागाने अधिकृत आकडेवारी जाहीर केल्यानंतर शमीम पठाण विजयी झाल्याचे समोर आले होते.