सल्लागाराकडून सादरीकरण : 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सद्यस्थितीतील प्रशासकीय इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिका नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी महापालिका भवनाजवळील महिंद्रा कंपनीच्या चार एकर भुखंडावर मंत्रालयाच्या धर्तीवर ही नऊ मजली इमारत बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरीमध्ये महापालिकेची प्रशासकीय इमारत आहे. येथे चार मजली इमारत असून या इमारतीचे 13 मार्च 1987 रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर टप्याटप्याने महापालिकेचे विस्तारीकरण करण्यात आले.
दोन मजल्यावर अधिकाऱ्यांची दालने आहेत तर, तिसऱ्या मजल्यावर पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. कार्यालये आणि दालनांसाठी जागा अपुरी पडते. तसेच, नोकर भरतीला मान्यता मिळाल्यास आणि कर्मचारी भरती झाल्यानंतर पुन्हा महापालिकेला जागेची आवश्यकता भासेल. त्यासाठी महापालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार प्रशस्त नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे.
महापालिका मुख्यालयापासून काही अंतरावर सहा एकराचा भूखंड महापालिकेला महिंद्रा कंपनीकडून “आयटूआर’अंतर्गंत मिळालेला आहे. या आरक्षित भूखंडावर चार एकर जागेत नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या जागेवर दोन पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू आहे. त्या भागाला संरक्षित करून त्याच्या बाजूला इमारत बांधण्यात येणार आहे.
मुंबईतील मंत्रालयाच्या धर्तीवर ही नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा खर्च आरखड्यात अपेक्षित धरण्यात आला आहे. या इमारतीचा आराखडा सल्लागाराकडून मंगळवारी (दि.17) महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या गटनेते, अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला. दरम्यान, महापालिका कारभार संपूर्णपणे नवीन इमारतीतून चालवायचा की काही विभाग तिथे स्थलांतरित करायचे? याबाबतचा निर्णय पदाधिकारी, गटनेत्यांना घेण्यास सांगण्यात आले आहे.
– चार एकर जागेवर नऊ मजली इमारत
– 72, 994 चौरस मीटर वापरायोग्य जागा
– 2250 दुचाकी पार्किंगची सोय
– 900 चारचाकी वाहने पार्किंगची सोय
– सर्व सोयी-सुविधांयुक्त प्रशस्त विभाग कार्यालये
व्यायामशाळा, बॅंक, एटीएमचा अंतर्भाव
– स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत ट्रान्स्फर स्टेशन बांधणे
– पूर्ण विभाग स्थलांतरित करण्याविषयी पर्यायाची चाचपणी
इमारतीचे काम दुसऱ्या ठिकाणी होणार असले तरी महापालिकेचे संपूर्ण विभाग त्या इमारतीमध्ये स्थलांतरित करायचे की नाही याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जात आहेत. काही विभाग जुन्या इमारतीमध्येच ठेवून कामकाज चालवायचे यासाठी तीन पर्याय ठेवण्यात आले आहे. तर जुन्या इमारतीचे नूतनीकरण करून त्याचा पुर्नवापर करणे व नवीन इमारतीत सर्व पदाधिकारी, अधिकारी, विभाग कार्यालये स्थलांतरित करून कामकाज चालवणे हा एक पर्याय ठेवण्यात आला आहे.