पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील पक्ष रिंगणात उतरले आहेत. अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यापासून युत्या, आघाड्या आणि उमेदवारांच्या बंडखोरीने गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. ते मंगळवारी सायंकाळी (दि. ३०) स्पष्ट झाले. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून महापालिकेसाठी बहुरंगी लढत होणार आहे. महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या निवडणुकीसाठी भाजपाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गटाशी युती केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युतीसंदर्भात सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने भाजपाने आरपीआयला सोबत घेत १२८ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यातील पाच जागांवर आरपीआयचे उमेदवार कमळ याच चिन्हावर लढणार आहेत. भाजपसोबत युतीचे फिस्कटल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. जास्तीतजास्त जागांवर उमेदवार लढविण्यासाठी त्यांनी शिवसैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, मंगळवारी अंतिम टप्यात उमेदवारांनी शिवसेनेच्या एबी फॉर्मसोबत अर्ज दाखल केले. त्यामध्ये सुमारे ३० उमेदवार रिंगणात असणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाने आघाडी केली आहे. याबाबतची घोषणा रविवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिखली येथील प्रचारसभेतून केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ११० ठिकाणी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. उर्वरित १८ जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला देण्यात आल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या वतीने १८ ठिकाणी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर प्रभाग क्रमांक ९ , २० आणि २६ मध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. याठिकाणी घड्याळ आणि तुतारी या दोन्ही चिन्हांवर उमेदवार लढणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी शहरामध्ये युती केली आहे. यामध्ये शिवसेना ५९ जागांवर लढणार आहे. तर मनसेने १७ ठिकाणी अधिकृत उमेदवारी दिली आहे. काँग्रेस आणि आपने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसने ६० जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर आपने ३५ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. माजी महापौरांनी ऐनवेळी बदलला एबी फॉर्म अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवडमधील एका माजी महापौरांची उमेदवारी निश्चित होती. त्यांना एबी फॉ़र्मही देण्यात आला. परंतु, त्यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीऐवजी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवीदाला धक्का दिला. या प्रकारे आणखी काही ठिकाणी असे झाल्याची शक्यता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. आरपीआयला पाच जागा महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आठवले गट यांची युती आहे. आरपीआयला पाच जागा देण्यात आल्या असून त्यांचे उमेदवार कमळ या भाजपच्या चिन्हावर लढणार आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधून कमलेश वाळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रभाग क्रमांक २५ मधून आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, ३० मधून चंद्रकांता सोनकांबळे, २१ मोनिका निकाळजे आणि १६ मधून धर्मपाल तंतरपाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.