महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारा निघाला सराईत मोबाइल चोर

पुणे(प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणारा तरूण सराईत मोबाईल चोरटा असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याने कर्ज फेडण्यासाठी थेट मोबाईल चोरीचा मार्ग पत्करला होता. मात्र, बिबवेवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन 1 लाख 88 हजारांचे 21 मोबाईल जप्त केले आहेत. तानाजी शहाजी रणदिवे (वय 33, रा. शांतीनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मोबाईल चोरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे आणि गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी गंगाधाम रोडवर चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती पोलीस अमंलदार सतिश मोरे यांना मिळाली. त्यामुळे पथकाने सापळा रचून नागरिकांना मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करणाऱ्या तानाजी रणदिवे याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे 6 मोबाईल आढळून आले. चौकशीत त्याने पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचे सांगितले. कर्ज फेडण्यासाठी बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरातून मोबाईलची चोरी करत असल्याची कबुली दिली.
तब्बल 50 हून अधिक मोबाईल चोरून अनोळखी व्यक्तींना विकल्याचे त्याने सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिील झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगांवकर, सतिश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी, राहुल शेलार यांनी केली.





