सभापती गायकवाडांविरोधात अविश्वास ठराव दाखल

आमदार औटी व सुजित झावरे यांचा पुढाकार : 25 ऑक्‍टोबरला विशेष सभा

पारनेर – पारनेर विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच बाजार समितीच्या संचालकांनी सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. अविश्‍वास ठराव दाखल करण्यामागे तालुक्‍यातील बदललेली राजकीय समीकरणे कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. आ. विजय औटी व जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे झालेले मनोमीलन यामागे असल्याचे सांगितले जात आहे.

सभापती गायकवाड हे राष्ट्रवादीत असून ते राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत, तर शिवसेनेचे उमेदवार आ. औटी यांच्यासोबत नुकतीच सुजित झावरे यांनी हातमिळवणी केली आहे. ते औटी यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. त्याचा परिणाम म्हणून अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा अविश्वास ठराव दाखल झाला असल्याची चर्चा आहे.

सभापती गायकवाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या 13 संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार सहायक निबंधक एस. डी. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले आहे. सभापती गायकवाड यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची ही दुसरी वेळ असून, या अगोदर हा ठराव त्यांनी हाणून पाडला होता. त्यामुळे यावेळी तो मंजूर होतो का, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी झावरे यांनी प्रचारात आपले वडील माजी आ. नंदकुमार झावरे यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर सभापती गायकवाड यांच्यावरच त्याच दिवशी अविश्‍वास ठराव दाखल झाल्याने पारनेरचे राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे.

गायकवाड यांच्यावर शिवसेनेचे संचालक काशिनाथ दाते, अशोक कटारिया, युवराज पाटील यांच्यासह उपसभापती विलास झावरे, राष्ट्रवादीचे संचालक अरुण ठाणगे, राहुल जाधव, गंगाराम बेलकर, राजेश भंडारी यांच्या सह्या आहेत, तर प्रशांत गायकवाड यांच्या बाजूने संचालक शिवाजी बेलकर, अण्णासाहेब बढे, संगीता कावरे, राजश्री शिंदे हे चार संचालक असून, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्‍टोबरला विशेष सभा होणार असल्याने याकडे सर्व तालुक्‍याचे लक्ष लागले आहे.

अभद्र युतीतून अविश्वास ठराव : गायकवाड

चांगुलपणाचे समाजकारण मोडीत काढण्यासाठी तालुक्‍यातील प्रस्थापित पुढारी एकत्र आले आहेत. स्वतःच्या आर्थिक व राजकीय स्वार्थासाठी पारनेर तालुक्‍यात प्रस्थापितांची अभद्र युती झाली असल्याची टीका सभापती प्रशांत गायकवाड यांनी केली आहे. बाजार समिती संचालकांची इच्छा नसतानाही त्यांच्यावर दबाव टाकून 15 संचालकांना असे करण्यास भाग पाडल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.