अल्पवयीन मुलाने केला बापाचा खून, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

यवत – दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील जुन्या वाहनांची खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारे राजेंद्र म्हस्के हे गेल्या ९ दिवसांपासून बेपत्ता झाल्याने चर्चेला परिसरात उधाण आले होते. मात्र त्यांचा खून झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून म्हस्के यांचा खून त्याच्या अल्पवयीन मुलाने केला आहे. बाप आईला त्रास देतो म्हणून मित्राच्या मदतीने त्याने बापाचा निर्दयीपणे खून केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड येथील राजेंद्र मस्के (वय ४२ वर्ष रा.पाटिल मळा, वरवंड ता. दौंड) हे गेल्या नऊ दिवसांपासून गायब असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने यवत पोलिस ठाण्यात दिली होती. त्या घटनेचा तपास करत असताना रविवारी त्यांचा खून झाल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. १७वर्षाच्या मुलाने बापाच्या डोक्यात हातोडी घालून खून करून त्यांचा मृतदेह येडशी येथील अभयारण्यात टाकला असल्याचे तपासात उघड झाले आहे.
राजेंद्र म्हस्के असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील त्यांचा अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र स्वस्तिक संजय खडके (वय-२१वर्ष, रा. वरवंड, ता.दौंड) यांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केशव वाबळे करीत आहेत.





