Pune : शासकीय अधिकाऱ्यांमधील कलाकारांचे संमेलन

पुणे : शासकीय कार्यालयातील फायलींमागे दडलेले चेहरे म्हणजे केवळ रुक्षता नव्हे, तर त्यांच्यातही अनेक कलाकार दडलेले असतात. त्याचा प्रत्यय शुक्रवारी आयोजित केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनात आला.
मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महापालिका आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन दि. २० ते २२ डिसें. या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालनात शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य-कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले असून याचे उद्घाटन शुक्रवारी झाले.
या वेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, माजी कुलगुरू एस. एस. मगर, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी मंचावर होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलन कालावधीत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.
पुण्यासह राज्यातील जवळपास २० अधिकाऱ्यांनी साकारलेल्या कलाकृती आणि साहित्यकृती या प्रदर्शनात आहेत. अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर लिहिलेली पुस्तके, छायाचित्रे, चित्रे, जुनी नाणी व नोटा, काष्ठशिल्पे तसेच खडूवर साकारलेली शिल्पे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. मान्यवरांच्या हस्ते अधिकाऱ्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पृथ्वीराज बी.पी. यांचेही भाषण झाले. डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, मुरली लाहोटी तसेच कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून सुरेश परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. सोनाली घुले-हरपळे, प्रांजल शिंदे-चोभे यांनी केले; आभार राजीव नंदकर यांनी मानले.
निरंजन सुधांशू, महासंचालक, यशदा
प्रदर्शन आणि संमेलनाच्या निमित्ताने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात लपलेले कलागुण समाजासमोर आले आहेत. अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना वैविध्यपूर्ण अनुभव येत असतात परंतु ते शब्दरूपात मांडण्यासाठी वेळ मिळू शकत नाही. या उपक्रमाच्या निमित्ताने एक नवीन चांगली सुरुवात होत आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन यशदाच्या ग्रंथालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतींचा स्वतंत्र विभाग सुरू करून अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यशदाच्या इमारतीत कायम स्वरूपी प्रदर्शनी मांडण्यात येईल.





