Drishyam 3 Box Office : पहिल्या दोन दिवसांत मोठा विक्रम! दृश्यम 3 चा कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क
Drishyam 3 Box Office : ‘दृश्यम’च्या याआधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

Drishyam 3 Box Office : अभिनेता अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम ३’ने चित्रपटगृहात प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घातला आहे. चित्रपटाला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या दीड दिवसांत चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा नेट कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ‘दृश्यम ३’कडून आगामी काळात मोठ्या कमाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘दृश्यम’च्या याआधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता तिसऱ्या भागालाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. सॅटनिलिकच्या आकडेवारीनुसार, ‘दृश्यम ३’ने दुसऱ्या दिवशी तब्बल ५३.५० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. त्यामुळे चित्रपटाची देशांतर्गत एकूण कमाई ११५.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर जागतिक स्तरावर चित्रपटाने १७७.१० कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.
दोन दिवसांच्या कमाईचा विचार केला, तर ‘दृश्यम ३’ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ पहिल्या, तर ‘पुष्पा २’ दुसऱ्या स्थानावर असल्याचे आकडेवारीतून समोर येते. ‘दृश्यम ३’च्या कथेत पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या बुद्धीचा आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी तो आखत असलेल्या डावपेचांचा थरार दाखवण्यात आला आहे.
लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश?
एका सामान्य माणसाकडून शिकलेल्या आणि अनुभवी अधिकाऱ्यांना कशाप्रकारे चकवा दिला जातो, हे चित्रपटाचे प्रमुख आकर्षण आहे. आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी विजय साळगावकर कोणत्या थराला जातो, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरत आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद असाच कायम राहिल्यास ‘दृश्यम ३’ लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






