नीरा : परिसरातील पुणे–मिरज रेल्वे मार्गालगत मंगळवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. झाडाझुडपांना लागलेली ही आग वेगाने पसरत असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे कर्मचारी आणि ज्युबिलंटच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मंगळवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रेल्वे किलोमीटर ८/१ ते ३ दरम्यान, गेट क्रमांक ३१ जवळ ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, पुणे – पंढरपूर मार्गावरून जाणाऱ्या एखाद्या निष्काळजी वाटसरूने टाकलेल्या काडीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज रेल्वे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. आगीची माहिती मिळताच लोणंद येथील वरिष्ठ रेल्वे पथ निरीक्षक स्वामीनाथ, कनिष्ठ पथ निरीक्षक मिलिंद रायते, रेल्वे पोलिस हवालदार सतीश पवार तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे सचिन गुणवंत,कर्मचारी लक्ष्मीकांत रेड्डी, राजू वणवे,जगन्नाथ सांगळे, बबन लकडे, त्याच बरोबर नीरा येथील स्वप्निल कांबळे आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीचे प्रमाण वाढत असल्याने ज्युबिलंट कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. रेल्वे सुरक्षेला धोका वाढण्याची शक्यता रेल्वे मार्गालगत असलेल्या अशा आगीच्या घटनांमुळे संपर्क यंत्रणेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वेच्या सिग्नलिंग आणि कम्युनिकेशनसाठी असलेल्या अनेक केबल्स जमिनीखाली असतात. आगीमुळे या केबल्सचे नुकसान झाल्यास रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. तसेच, आग मोठ्या प्रमाणात पसरल्यास धावत्या रेल्वेलाही धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी अशा घटना घडल्यास मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना आवाहन, प्रशासनालाही सूचना “रेल्वे मार्गालगत झाडाझुडपांना आग लावू नये,” असे आवाहन स्थानिक स्वप्निल कांबळे यांनी नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेही मार्गालगतचा पाला-पाचोळा आणि कोरडी झाडेझुडपे वेळोवेळी हटवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.