दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट

दिल्ली : दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाला. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सीआरपीएफ शाळेची भिंत, जवळपासची दुकाने आणि काही गाड्यांचे नुकसान झाले. पोलिसांनी सांगितले की, स्फोटानंतरचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये दाट धूर दिसत आहे. बॉम्ब निकामी पथक, फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा आणि विशेष कक्ष तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.
सणासुदीच्या काळात दिल्लीत झालेल्या या स्फोटाबाबत सुरक्षा यंत्रणांनी चिंता व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) टीमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपास अहवालात स्फोटात वापरलेली सामग्री क्रूड बॉम्बसारखी आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 07:47 वाजता पीसीआर कॉल आला.
कॉलरने माहिती दिली की रोहिणीच्या सेक्टर 14 मधील सीआरपीएफ शाळेजवळ मोठा स्फोट झाला आहे. त्यानंतर एसएचओ आणि कर्मचारी पोहोचले. घटनास्थळी जवळपासच्या दुकानांच्या काचा आणि दुकानाजवळ उभ्या असलेल्या कारचेही नुकसान झाले आहे. सतर्कता आणि तपास वाढवण्यासाठी जवळपासच्या पोलिस ठाण्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. बाजारपेठांमध्ये पायी गस्तही वाढवण्यात आली आहे. लोकांनी कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांची एटीएस या घटनेचा दहशतवादी दृष्टिकोनातून तपास करत आहे. सीवर लाइन आणि सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) लाही माहिती देण्यात आली आहे. ते लवकरच घटनास्थळी पोहोचू शकतात.





