BMC : शिंदेसेनेच्या आमदार पुत्राला मोठा धक्का! अंतर्गत मतभेद उघड; नेमकं काय घडलं?
BMC : मुंबई महापालिकेतील या निवड प्रक्रियेमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आणि महायुतीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

BMC : शिंदेसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांचे पुत्र प्रणव लांडे यांना मुंबई महापालिकेतील निवड प्रक्रियेत मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिकेच्या एल विभागातील अशासकीय सदस्यांच्या निवडणुकीत प्रणव लांडे यांच्यासह आणखी दोन उमेदवारांचा पराभव झाला. या निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांसह महायुतीतील भाजपच्या विरोधाची भूमिकाही समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर
एल विभागातील अशासकीय सदस्यांच्या निवडीवरून शिवसेनेतील मतभेद उघड झाले आहेत. शिवसेनेचे सदस्य किरण लांडगे आणि मीनल तुरडे यांनी या निवड प्रक्रियेला विरोध केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच भाजपचे नगरसेवक हरीश भांदिर्गे यांनीही विरोधाची भूमिका घेतल्याने महायुतीमधील मतभेद समोर आले. शिवसेनेतील दोन सदस्यांसह भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केल्यामुळे प्रणव लांडे यांच्यासह तिघांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
१७ अर्जांपैकी १४ अर्जांत त्रुटी
मुंबई महापालिकेच्या एल विभागातील प्रभाग समितीवर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार होती. या पदांसाठी ८ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर एकूण १७ अर्ज प्राप्त झाले. अर्ज आणि संबंधित कागदपत्रांची छाननी केल्यानंतर १४ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आमदार दिलीप लांडे यांचे पुत्र प्रणव लांडे यांच्यासह केवळ तीन उमेदवार पात्र ठरले.
मतदानात विरोधकांचे पारडे जड
या निवड प्रक्रियेसाठी झालेल्या मतदानात एकूण ११ सदस्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी नऊ सदस्यांनी विरोधात, तर दोन सदस्यांनी बाजूने मतदान केल्याची माहिती आहे. या मतदानाच्या निकालामुळे प्रणव लांडे यांच्यासह अन्य दोन उमेदवारांचा पराभव झाला.
महायुतीतील मतभेदांची चर्चा
मुंबई महापालिकेतील या निवड प्रक्रियेमुळे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आणि महायुतीतील घटक पक्षांमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आमदार दिलीप लांडे यांच्या पुत्राचा पराभव झाल्याने या निकालाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आता या प्रकरणावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





