Abhijeet Bichukale : ‘बिग बॅास’फेम अभिजीत बिचुकलेंना मोठा धक्का! मिळाली फक्त इतकी मत
Abhijeet Bichukale : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Abhijeet Bichukale : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला. आता निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. कालपासून सुरू असलेली मतमोजणी अद्याप सुरू असून, उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अभिजीत बिचुकले यांना केवळ १९ मते
आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांना अवघी १९ मते मिळाली आहेत. शिक्षक आणि पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघांत निवडणूक लढवणाऱ्या बिचुकले यांना मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे.
कौस्तुभ गावडे यांची आघाडी कायम
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयासाठी २५ हजार ७५६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना १७ हजार ६०० मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना ११ हजार ३२८ मते मिळाली आहेत. ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार कौस्तुभ गावडे यांची स्थिती मजबूत दिसत असली, तरी विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे लक्ष लागले आहे.
मतांचा कोटा कसा ठरवला जातो?
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत मतमोजणीसाठी पसंतीक्रम पद्धतीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला निश्चित मतांचा कोटा पूर्ण करावा लागतो.
एखाद्या उमेदवाराने हा कोटा पूर्ण केल्यास त्याला विजयी घोषित केले जाते. मात्र, कोणत्याही उमेदवाराला आवश्यक कोटा मिळाला नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद केले जाते. त्याच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या पसंतीची मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात वर्ग केली जातात.
त्यानंतरही कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला नाही, तर पुढील सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीची मते मोजली जातात. आवश्यक मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते.





