Drug Safety: नकली औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! औषधांच्या फॅक्टरीपासून रुग्णांपर्यंत प्रत्येक हालचालीवर राहणार नजर
Drug Safety केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांची साठवणूक आणि वितरण यासाठी नवीन नियम लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये औषधांच्या खरेदीपासून ते साठवणूक, वाहतूक आणि वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्याची तयारी आहे. या नियमांमुळे नकली आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Drug Safety: बाजारात मिळणाऱ्या नकली आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकदा औषधांची निर्मिती योग्य पद्धतीने झालेली असली, तरी त्यांची साठवणूक आणि वाहतूक करताना निष्काळजीपणा झाल्यामुळे औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय नकली औषधांची विक्री आणि पुरवठा रोखणेही आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार औषधांच्या वितरण व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे. आता औषधांची निर्मिती झाल्यानंतर केवळ कंपनीची जबाबदारी संपणार नाही, तर औषध कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर ते रुग्णांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांची साठवणूक आणि वितरण यासाठी नवीन नियम लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये औषधांच्या खरेदीपासून ते साठवणूक, वाहतूक आणि वितरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्याची तयारी आहे. या नियमांमुळे नकली आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा रोखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
काय आहेत सरकारचे नवीन नियम?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुड्स स्टोरेज अँड डिस्ट्रिब्युशन प्रॅक्टिस (GSDP) म्हणजेच औषधांची योग्य साठवणूक आणि वितरण प्रक्रिया ही संकल्पना ड्रग्स रूल्स, १९४५ मध्ये समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे.
या प्रस्तावानुसार औषधांची खरेदी कुठून झाली, ती कोणत्या गोदामात ठेवण्यात आली, त्यांची वाहतूक कशी झाली आणि कोणत्या वितरकाकडे पोहोचली, याची सविस्तर नोंद ठेवावी लागणार आहे. त्यामुळे औषधांच्या पुरवठा साखळीतील प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
औषधे कुठे ठेवली, कशी पोहोचली याचा मिळणार हिशोब
औषधांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी त्यांची योग्य वातावरणात साठवणूक करणे आवश्यक असते. काही औषधांसाठी विशिष्ट तापमान राखणे गरजेचे असते. मात्र, गोदामात किंवा वाहतुकीदरम्यान योग्य काळजी घेतली नाही, तर औषधांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
नवीन प्रस्तावित नियमांनुसार औषधांची साठवणूक निर्धारित तापमान आणि योग्य वातावरणात करावी लागेल. तसेच औषधांच्या वाहतुकीदरम्यानही आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक असेल. यामुळे औषधे खराब होणे, त्यामध्ये भेसळ होणे, संसर्गाचा धोका निर्माण होणे किंवा औषधांची अदलाबदल होणे अशा प्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.

Drug Safety
नकली औषधांचा शोध घेणे होणार सोपे
नवीन नियमांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधांच्या पुरवठा साखळीचा संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध असणार आहे. एखाद्या औषधाच्या साठ्यामध्ये गडबड आढळल्यास ते औषध नेमके कुठून आले, कोणत्या कंपनीने तयार केले, कोणत्या आयातदाराकडून किंवा वितरकाकडून त्याचा पुरवठा झाला आणि पुढे कोणत्या ठिकाणी पाठवण्यात आले, याची माहिती मिळवणे शक्य होईल. यामुळे एखाद्या औषधाच्या विशिष्ट खेपेमध्ये दोष आढळल्यास संबंधित औषधांचा पुरवठा शोधून त्यावर वेळीच कारवाई करता येऊ शकते. तसेच नकली औषधांचा बाजारात प्रवेश रोखण्यासही मदत होईल.
केंद्र आणि राज्य सरकार ठेवणार लक्ष
औषधांची गुणवत्ता तपासताना केवळ उत्पादनाच्या वेळी होणारी तपासणी पुरेशी नसते. उत्पादनानंतर साठवणूक आणि वाहतुकीमध्ये होणाऱ्या चुका औषधांच्या गुणवत्तेवर आणि परिणामकारकतेवर परिणाम करू शकतात, असे आरोग्य मंत्रालयाचे मत आहे.
त्यामुळे प्रस्तावित नियमांनुसार केंद्रीय आणि राज्य औषध नियंत्रण विभागांना औषधांच्या वितरण व्यवस्थेची तपासणी करण्यासाठी अधिक सक्षम अधिकार मिळण्याची अपेक्षा आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठीही या तरतुदी उपयुक्त ठरू शकतात.
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल
नकली आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे औषधांच्या उत्पादनापासून ते रुग्णांच्या हातात पोहोचेपर्यंत गुणवत्ता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारचा हा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू झाल्यास औषध वितरण व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास आणि नकली औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. आता या प्रस्तावाचे अंतिम नियम कधी लागू होतात आणि त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


