मुंबई : महापालिका निवडणुकीचे वारे तापू लागले असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदांवरून तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना त्यांचा विश्वासात न घेतल्याने स्नेहल जाधव या तीव्र नाराज झाल्या होत्या. या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. स्नेहल जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत १९९२ ते १९९७, १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ अशा सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून काम केले आहे. त्यानंतर २००७ ते २०१२ या काळात त्यांचे पती नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कुटुंबाने या वॉर्डमध्ये सलग तीनवेळा यश मिळवूनही मनसेकडून यावेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांची नाराजी कमालीची होती. हे राजीनामा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांत मनसेतून अनेक नेत्यांनी पक्ष सोडण्याचे सत्र सुरू झाले असून, ठाकरे गटाशी झालेल्या युतीनंतरही अंतर्गत नाराजी कमी होताना दिसत नाही. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी युती-आघाडीचे राजकारण रंगत असताना अनेक पक्षांत तिकीट कापण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये असंतोष वाढला आहे.