प्रभात वृत्तसेवा विंझर – ऐतिहासिक राजगड बालेकिल्ला परिसरात दुपारी झालेल्या अपघाताने पर्यटकांमध्ये खळबळ उडाली. बालेकिल्ल्याजवळ फिरत असताना एका 31 वर्षीय महिला पर्यटकाच्या डोक्यावर अचानक दगड कोसळला. जखमीचे नाव वर्षा दत्तात्रेय हुंडारे (रा. मुंबई) असे गंभीर दुखापत झालेल्या तरूणीचे नाव आहे.पर्यटक तरूणीवर दगड कोसळल्याची माहिती मिळताच पुरातत्त्व खात्याचे बापू साबळे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी उपलब्ध संसाधनांच्या आधारे जखमी तरुणीवर गडावरच योग्य प्राथमिक उपचार केले. जखमी तरुणीला तातडीने खाली आणण्यासाठी पुरातत्त्व खात्याचे बापू साबळे, विशाल पिलावरे तसेच इतर चार ते पाच सदस्यांनी आव्हानात्मक मार्गावरून वेगवान रेस्क्यू मोहीम राबवली. केवळ २५ मिनिटांच्या विक्रमी वेळेत जखमीला बालेकिल्ल्यावरून खंडोबाच्या मळ्यापर्यंत सुरक्षित आणण्यात आले. रेस्क्यूदरम्यान परिसरातील पोलीस पाटील शिर्के यांनी तातडीचा संपर्क, समन्वय आणि आवश्यक माहिती पुरवून महत्त्वाची मदत केली.घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापनचे सदस्य ओंकार ओक यांनी फोनवरून सतत संपर्क ठेवत आवश्यक शासकीय मदत, समन्वय तसेच ऍम्ब्युलन्सची सोय तात्काळ उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्यामुळे जखमीच्या पुढील उपचाराकडे वेळेवर गती मिळाली. खंडोबाच्या मळ्यावर आणल्यानंतर जखमीची प्रकृती तपासून तिला खासगी वाहनातून पुण्यातील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी रवाना करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.