एका पत्रानं गुंफलं बहीण-भावाचं प्रेमळ नातं!

जयंत जाधव
सिंहगड रस्ता – तो लष्करात नाईक पदावर. सात-आठ वर्षांपूर्वी कारगिलच्या सीमेवर देशरक्षणाचे कर्तव्य बजावत असताना रक्षाबंधनानिमित्ताने त्याला एक पत्र मिळालं. हे पत्र त्याला लिहिलं होतं त्याच्या चौदा वर्षांच्या बहिणीनं. ती बहीण त्याच्या ना रक्ताची ना ओळखीची! पण पत्रातील शब्दांनी त्याच्या मनाचा ठाव घेतला अन् त्यानं हाती मोहीम घेतली ती या अनोळखी बहिणीच्या शोधाची. विशेष म्हणजे ही बहीण होती धायरीतील. कैक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नुकतीच या दोघा बहीण-भावाची भेट झाली अन् एका नात्याची वीण गुंफली गेली…
या दोघांच्या पवित्र नात्याचा सोहळा धायरीतील स्व. बंडोजी खंडोजी विद्यालयात रंगला. हा भावनिक क्षण टिपण्यासाठी शाळेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकही उपस्थित होते.
माधव मोरे असे या जवानाचे नाव. ते 24, मराठा बटालियनमध्ये सात-आठ वर्षांपूर्वी कारगिल येथे पोस्टिंगला होते. त्यावेळी राखीपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुण्यातील स्व. बंडोजी खंडोजी विद्यालयातून राखी आणि पत्र आले. मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्राचे वाचन केले. हे पत्र नववीतल्या मुलीने लिहिले होते. ते पत्र वाचून मोरे भावुक झाले. पत्र आणि राखी त्यांनी जपून ठेवली. रोज महिनाभर ते त्या पत्राचे वाचन करत होते. मित्रांना-नातेवाईकांना त्याबद्दल सांगत होते. एक दिवस आपण या विद्यार्थिनीला भेटायचंच, असं त्यांनी ठरवलं.
दरम्यान, त्यांच्या बऱ्याच ठिकाणी बदल्या झाल्या. गेल्या वर्षी पुण्यातील औंध येथे त्यांची बदली झाली. पुण्यामध्ये आल्यावर त्यांनी जोमाने शोध सुरू केला. संबंधित विद्यालयाचा नंबर घेऊन त्यांनी फोन केला; परंतु शाळेकडून त्यांना संबंधित मुलीचा नंबर मिळू शकला नाही.
दरम्यान, मोरे यांना एकदा राजू चव्हाण नावाचे धायरीतील रिक्षाचालक भेटले. त्यांच्याकडून त्यांना संस्थेचे संचालक काका चव्हाण यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. मोरे यांनी काका चव्हाण यांच्याशी संपर्क साधून सर्व कहाणी सांगितली. चव्हाण यांनी मोरे आणि त्या विद्यार्थिनीलाही शाळेत बोलावून घेतले. तेव्हा न पाहिलेल्या बहिणीला पाहून मोरे यांचे डोळे ओलावले. या विद्यार्थिनीचे नाव सांचल विजय खेडेकर. ती सध्या कॉम्प्युटर इंजिनियर असून, एका कंपनीत नोकरी करते.
मोरे म्हणाले, माझ्या आयुष्यामधील सर्वांत अनमोल ठेवा हे पत्र आणि राखी रूपाने मला माझ्या बहिणीने दिला आहे. आम्ही देशसेवा करताना देशातील विद्यार्थिनी आमच्याबद्दल एवढे चांगले लिहितात, याचा खूप अभिमान आहे.
सांचल म्हणाली, “”मी शेतकरी कुटुंबातील आहे. मला भाऊ नाही; परंतु माझा भाऊ सैन्यात गेला असता तशी मी कल्पना करून हे पत्र लिहिलं होतं. मला आज सांगायला अभिमान वाटतो, की मला माझा भाऊ मिळाला.” ही अनोखी भाऊबीज बघून उपस्थितांना गहिवरून आले. यावेळी अनिकेत चव्हाण, मुख्याध्यापक विलास खाड, उमाजी पवार उपस्थित होते.
अनुकरणीय गोष्ट
काका चव्हाण यांनी सांगितले, की आम्ही शाळेमध्ये विविध उपक्रम राबवत असतो. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, हाच त्यामागचा उद्देश असतो. आमची विद्यार्थिनी सांचल खेडेकर हिने लिहिलेलं पत्र योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचले. मोरे यांनी त्या पत्राची दखल घेतली. हा संदेश सर्वच भारतीयांना अनुकरण करावासा वाटेल.





