प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – संकष्ट चतुर्थीनिमित्त रविवारी (दि. ७) श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथे श्रीमहागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक संपन्न झाल्यावर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सुट्टीचा दिवस आणि संकष्टी चतुर्थीचा योग आल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. देवस्थानतर्फे भाविकांसाठी जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच, सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी दिली. दुपारी १२ वाजता मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्यावतीने गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच, श्रीमहागणपती भजनी मंडळाचा भजन कार्यक्रमही पार पडला. यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्ष स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉ. तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके, तसेच देवस्थान कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.