१४ फेब्रुवारीला बहुप्रतिक्षित छावा चित्रपट देशभरात रिलीज होत आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट असणार आहे. नुकतेच छावामधील काही गाण्यांचे टीझर शेअर करण्यात आले आहेत. याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. छावामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तीरेखा अभिनेता विकी कौशलने साकारलेली आहे. त्याने यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दोघांनी क्लायमॅक्सच्या सीनबद्दल महत्वाचा खुलासा केला आहे. महाराजांच्या अंतिम काळात औरंगजेबाने त्यांचा खूप छळ केला होता. हे दृश्य शूट करताना विकीच्या हाताला खरोखरच दुखापत झाली असल्याचे उतेकर यांनी सांगितले.”संपूर्ण रात्र विकीचे हात साखळदंडाने बांधलेले होते आणि जेव्हा आम्ही दोरी काढली तेव्हा त्याचे हात खालीच येत नव्हते. त्याचे हात सुन्न पडले होते. यानंतर आम्हाला शूटिंगसाठी दीड महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता. आम्ही क्लायमॅक्सच्या सीनसाठी संपूर्ण सेट बनवलेला तो काढून बरखास्त केला.” विकीला बरं होण्यासाठी साधारण दीड महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर पुन्हा सेट बांधला आणि नंतर शुटिंगला सुरूवात झाल्याचे उतेकर यांनी सांगितले. तसेच या चित्रपटाच्या शुटिंगच्या अगोदर विकीने तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याचे उतेकर यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये विकीचे जल्लोषात स्वागत छावा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशले करत आहेत. मुंबईतील छावाचे प्रमोशन आटपून विकी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाला होता. यावेळी त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज चौकात विकीने आपल्या हातामध्ये भगवा ध्वज घेऊन फडवला. यावेळी त्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी येथे झाली होती. दरम्यान, या चित्रटात विकीसोबत आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेन्टी, प्रदीप राम सिंह रावत, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, किरण करमरकर यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत.