बापरे… एक लिंबू 7 रुपयांना !

मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ
पुणे – मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात बाजारात लिंबू उपलब्ध आहे. त्यामुळे लिंबाचे भाव कडाडले असून, किरकोळ बाजारात नगास 5 ते 7 रुपये मोजावे लागत आहेत.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. मार्केट यार्डातील फळ विभाग बंद आहे. परिणामी, आवक जास्त होत नसल्याने लिंबाचे भाव तेजीत आहेत. बाजारात तुलनेने कमी दर्जाचा माल उपलब्ध आहे. मात्र, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त असल्याने लिंबाला जास्त मागणी आहे.
याविषयी लिंबाचे व्यापारी रोहन जाधव म्हणाले, उन्हाळ्यात लिंबांना मागणी असते. या कालावधीत सोलापूर, नगर जिल्ह्यांतून आणि हैद्राबाद, चेन्नई भागांतून दीड ते दोन हजार गोणी लिंबाची आवक होत असते. किरकोळ बाजारात पाच रुपयांना दोन नग लिंबाची विक्री होत असते मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. माल असूनही विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नाही. तर, दुसरीकडे शहरात मालाचा तुटवडा आहे. जिल्ह्यातील काही भागातून लिंबू विक्रीस येत आहेत. त्या लिंबाची चढ्या भावाने विक्री होत आहे.





