Pune District : दिल्ली ते बांधापर्यंत जनतेसाठी धावणारे नेतृत्व; शेतकऱ्यांचा आधार, युवकांचा विश्वास आणि विकासाचा ध्यास
Pune District : सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ (दादा) माने यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे धडे घेत वाढलेल्या प्रवीणभैय्या यांनी लहान पणापासूनच शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांशी आपली बांधिलकी जपली.

इंदापूर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात गेल्या काही वर्षांत ज्या युवा नेतृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्या नावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीणभैय्या माने यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
१७ जून हा त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा घेतलेला आढावा म्हणजे संघर्ष, समाजसेवा, विकास आणि जनसंपर्क यांच्या संगमाची एक प्रेरणादायी कहाणी आहे. सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ (दादा) माने यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे धडे घेत वाढलेल्या प्रवीणभैय्या यांनी लहान पणापासूनच शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण समाजाच्या प्रश्नांशी आपली बांधिलकी जपली.
सोनाई परिवाराने अनेक दशकांपासून शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांच्या हितासाठी केलेले कार्य आजही जनमानसाच्या स्मरणात आहे. त्या सामाजिक वारशाला आधुनिक विचारांची जोड देत प्रवीणभैय्या माने यांनी स्वतःची स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत आणि विविध सामाजिक कल्याणकारी योजनांची माहिती व लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा लाभ इंदापूर तालुक्याला मिळावा यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर आणि आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गावागावात, वाड्या-वस्त्यांवर त्यांनी कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभे केले आहे.
अलीकडेच अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत प्रवीणभैय्या हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच पंचनामे तातडीने व्हावेत, शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक, युवक, महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील उद्योजक यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. इंदापूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढताना त्यांनी मिळविलेली सुमारे ४० हजार मतांची साथ ही त्यांच्या वैयक्तिक जनाधाराची साक्ष आहे.
राज्य आणि केंद्रातील प्रभावी संपर्कांचे विकासात रूपांतर
प्रवीणभैय्या माने यांच्या नेतृत्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्यांचे राज्य आणि केंद्र स्तरावरील प्रभावी संबंध. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, राज्यातील मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचे स्नेहपूर्ण आणि विश्वासाचे संबंध आहेत.
या संबंधांचा उपयोग त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी केला आहे. विविध विकासकामांची मंजुरी आणि शासकीय निधी यांसाठी त्यांनी सातत्याने मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आज “दिल्लीपासून मंत्रालयापर्यंत आणि मंत्रालयापासून गावाच्या बांधापर्यंत पोहोच असलेले नेतृत्व” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
सामाजिक जाणीव जपणारे व्यक्तिमत्त्व
राजकारण आणि समाजकारणाबरोबरच धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विविध धार्मिक उत्सव, मंदिर विकास, सांस्कृतिक परंपरांचे जतन, युवकांमध्ये संस्कारमूल्यांची जोपासना आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणाऱ्या उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेतात.
सोनाई परिवाराच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवरील दाद
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोनाई परिवाराला दिलेल्या भेटीदरम्यान शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्रामीण समाजासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले होते. ग्रामीण विकास आणि शेतकरीहिताच्या क्षेत्रात सोनाई परिवाराने उभा केलेला आदर्श राज्यातील अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले होते.
आज इंदापूर तालुक्यातील अनेक युवकांसाठी प्रवीणभैय्या माने हे प्रेरणेचे केंद्र बनले आहेत. संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व, जनतेशी कायम जोडलेली नाळ, विकासासाठी असलेली धडपड आणि समाजकारणाची परंपरा यामुळे आगामी काळात त्यांच्याकडे राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. जनसेवा, विकास आणि समाजहिताचा हा प्रवास अधिक व्यापक होत राहो, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे कार्य अधिक बळकट होवो, हीच वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून व्यक्त होत असलेली भावना आहे. “जनतेचा विश्वास… शेतकऱ्यांचा आधार… आणि विकासासाठी झटणारे नेतृत्व — प्रवीणभैय्या माने!”





