Wagheshwar Temple : महाशिवरात्री निमित्त वाघेश्वर मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

वाघोली : वाघोली येथे महाशिवरात्री निमित्त वाघेश्वर मंदिरात मध्यरात्री पासूनच हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभर अबाल वृद्धांनी वाघेश्वर मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणात गजबजून गेला होता. वाघोली गावठाण येथील महादेव मंदिरामध्ये देखील दिवसभर दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
वाघोली येथील वाघेश्वर मंदिर हे पुरातनकालीन आहे. महाशिवरात्रीला वाघोली व परिसरातून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. सप्ताहादरम्यान दररोज कीर्तन व भाविकांना अन्नदान केले गेले. महाशिवरात्री संगीत पहाट कार्यक्रमाचे आयोजनही केले गेले होते. महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरामध्ये फूल, खेळणी, प्रसादाची दुकाने थाटल्याने यात्रेचे स्वरूप आले होते.
दरवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट यावेळी करण्यात आली होती. मंदिरासमोरील मंडपामध्ये हरिनामाचा जाप व भजन-किर्तन दिवसभर सादर करण्यात आले. वाघोली पोलिस व वाघोली विकास प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांना दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तींच्या वतीने भाविकांना लस्सी, केळी, फराळ, पाणी बॉटलचे वाटप केले गेले.





