लोणीकंद : कोरेगाव भीमा – पेरणे या दोन गावांदरम्यान भीमा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला पेरणे बाजूला बघदाड पडून आजूबाजच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्यावर संताप व्यक्त केला आहे. भीमा नदीवर वाहून आलेल्या जलपर्णी, झाडांच्या फांद्या, प्लास्टिक च्या पिशव्या वेळोवेळी न काढत बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यानेच भगदाड पडले असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. मागील महिन्यापासून होत असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशातच आता या आठवड्यात झालेल्या पावसाने पाणी बंधाऱ्यावरून न जाता पेरणे बाजूने गेल्याने बंधाऱ्याची कडा वाहून गेल्याने नदीकाठावर मोठे भगदाड पडले आहे. बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस पेरणे, डोंगरगाव, डिंग्रजवाडी,कोरेगाव भीमा, पिंपरी सांडस सह अनेक गावांच्या नदीकाठावरील विद्युत पंप वाहून गेल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पेरणे बाजूला बंधाऱ्याला पडलेल्या भगदाडावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर मोठी हानी होणार असल्याची शक्यता नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी पाटबंधारे खात्याच्या निष्काळजी पणामुळे कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्या लगत पडलेल्या भगदाडामुळे आजूबाजूंच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचा त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतितातडीची मदत मिळावी. यासाठी शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी केली आहे. – निलेश वाळके (माजी सरपंच पेरणे) कोरेगाव भीमा ग्रामपंचायत च्या वतीने 27 मे 2025 रोजी पाटबंधारे विभागाला पत्र व्यवहार करण्यात आला होता. पाटबंधारे विभागाने या पत्राला संवेदनशीलता आणि कार्यतत्परता दाखवायला हवी होती. संबंधित विभागाने वेळेत दुरुस्ती केली असती तर आज ही वेळ आली नसती. बंधारा फुटल्याने पेरणे बाजूला असणारा भीमा नदी काठ मोठ्या प्रमाणात कोरला गेला आहे. प्रशासनाने तातडीने नवीन बंधारा बांधून देत भविष्यातील नागरिकांचे व उद्योगधंद्यांचे नुकसान टाळावे. संदीप ढेरंगे, सरपंच कोरेगाव भीमा संबंधित कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची की वॉल पावसाच्या पाण्याच्या दाबाने वाहून गेली असून सदर दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल. राजाराम आहेर, शाखा अधिकारी – कोंढापुरी पाटबंधारे शाखा