पिंपळे सौदागरमध्ये ‘मटक्या’ची जत्रा

शहरातील अनेक भागात राजरोस मटक्याचे “अड्डे’
पिंपरी – पिंपळे सौदागरमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीच्या समोरच मटक्याची जत्रा भरत आहे. विशेष म्हणजे सांगवी पोलिसांना याबाबत माहिती असूनही त्यावर कारवाई होत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
पिंपळे सौदागर येथील पेट्रोल पंपाकडून बीआरटी रोडकडे जाताना यश संकुल नावाची मोठी उच्चभ्रू सोसायटी आहे. या सोसायटीच्या समोरील बाजूस पाण्याची विहीर आणि त्याच्या बाजूला आत मोकळ्या मैदानाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यापासून दोनशे फूट आत गेल्यावर मोठी पत्र्याची शेड आहे. या शेडमध्ये मोठ्या प्रमाणात मटका खेळला जात आहे. सायंकाळच्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी नागरिक येतात. यामुळे या परिसरातला जत्रेचे स्वरूप येते. येथे येणाऱ्यांमध्ये गुंड, मवाली आणि दारूड्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे या परिसरात नेहमी भांडणे होत असतात.
झुनकर नावाची व्यक्ती हा मटक्याचा अड्डा चालवत आहे. आत मोठ्या शेडमध्ये जवळपास बारा ते पंधरा टेबल आहे. येथील मटका अड्ड्याबाबत सुरवातीला सोसायटीमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या. मात्र येथील नागरिकांना पोलीस आणि मटका चालकाच्या गुंडांकडून दमदाटी झाल्याचे समजते. मात्र भांडणे नकोत म्हणून येथील नागरिक भितीच्या वातावरणात जगत आहेत. मटक्याच्या अड्ड्यामुळे आसपासच्या सोसायट्यांमधील नागरिकांनी आपली घरे विकून अन्य ठिकाणी घरे घेतल्याचे काही नागरिकांनी सांगितले. एखाद्याने तक्रार केल्यास सांगवी पोलिसांची गाडी येते. या धंद्यावर दाखविण्यापुरती कारवाई होते. मात्र थोड्याच वेळात धंदा परत सुरू होतो. पोलीस या धंद्याकडे “सोयीस्कर’रित्या दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट होत आहे.





