पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बंद हृदयाची धडधड सुरू करण्यासाठी बड्या रूग्णालयांमधील शस्त्रक्रियेवरील खर्चाचा आकडा एकताच नातेवाईकांची धडधड वाढते, अशा स्थितीत गरीब, गरजू आणि सर्वसामान्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात हृदय शस्त्रक्रिया केल्या जात असून मागील सात वर्षांत जवळपास दहा हजार जणांना यातून संजीवनी देण्याचे काम या रूग्णालयाने केले आहे. पुणे महापालिका आणि टीएचएस (टोटल हार्ट सोल्युशन) व्हेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्तविद्यमाने ही सेवा दिली जात आहे. सध्याचे धकाधकीचे जीवन, वाढता ताण-तणाव, बदलेली जीवनशैली, जंकफुड्स आणि व्यायामाचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या समस्या वाढल्या. पन्नाशीनंतर उद्भवणारा हृदयविकाराचा धोका आता वीसीत आला आहे. हृदयाची धडधड कमी झाली किंवा अचानक बंद पडल्यावर रूग्णाला तत्काळ उपचार मिळणे आवश्यक असते. मात्र, बड्या रूग्णालयांमध्ये अॅंजोग्राफी आणि अॅजोप्लास्टीचा खर्च एकताच गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींचे हृदय बंद पडण्याची वेळ येते, अशा स्थितीत कमला नेहरू रूग्णालय आधार ठरत आहे. महापालिकेच्या टीएचएस व्हेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सुरू झालेल्या या रूग्णालयात शासकीय दरात उपचार दिले जातात. शहरी गरीब आरोग्य योजना आणि महात्मा फुले योजनेतून नाममात्र किंमतीत उपचार मिळतात. त्यामुळे हृदयसंबधीत उपचारासाठी रूग्णांचा या रुग्णालयावरील विश्वास वाढला आहे. टीएचएस व्हेलनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमकडून मागील सात वर्षांत तब्बल १० हजार रूग्णांना अॅजोग्राफी आणि अॅन्जोप्लास्टीचे उपचार दिले गेले. यामध्ये ५ हजार ७६६ जणांची अॅन्जोग्राफी तर ३ हजार ८१६ जणांची अॅन्जोप्लास्टी करण्यात आली. बायपास, व्हाॅल्स रिप्लेसमेंट या शस्त्रक्रिया ४६७ तर ९७ जणांचे इलेक्ट्रो फिजिकोलाॅजी करण्यात आले. रूग्णालयात रूग्ण आणि नातेवाईक यांचे समुपदेशनही होते. आत्तापर्यंत तब्बल १ लाख ५४ हजार ५८३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती टीएचएसचे प्रमुख अजय तायडे यांनी दिली. गरिब, सर्वसामान्यांना परवडेल या उद्देशाने टीएचएस कंपनी स्थापन करून महापालिकेच्या संयुक्तविद्यमाने सेंटर सुरू केले आहे. याठिकाणी उत्तम आणि अनुभवी डाॅक्टरांची टीम असून, शहरी गरीब आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीबा फुले योजनेअंतर्गत उपचार दिले जातात. योग्य निदान, योग उपचार तेही माफक दरात हाच उद्देश ठेवून सेवा सुरू केली. – अजय तायडे, प्रमुख टीएचएस