प्रभात वृत्तसेवा वाघापूर – पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे नवविवाहितेच्या पहिल्या प्रियकराने दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून तिच्या पतीचो कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात खळबळ उडाली आहे. दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर), असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर, मूळ रा. राहू ता. दौड) हा फरार झाला आहे. जेजुरी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.राजेवाडी येथील दीपक जगताप याचा नुकताच वाघापूर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मृत दीपक जगताप हा उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता. नोकरीनिमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला होता. महिनाभर संसार सुरळीत चालू असताना पायलचा पाहिला प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हाटसप कॉल करून मी पायलशी लग्न करणार होतो. तुम्ही दोघांनी लग्न का केले, असा राग मनात धरून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. याबाबत मृत दीपक याने घरात ही माहिती दिली होती.दरम्यान, (दि.१३) दीपक हा पायल हिच्यासह राजेवाडीत आला. पायल हिला घरी सोडून सुशांत मापारी सतत कॉल करून पायलचा मोबाइल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा. लग्नाचा वाद मिटवून टाकू, असे सांगत होता. त्याला भेटून येतो, असे सांगून दीपक हा माळशिरस येथे गेला. माळशिरस हद्दीत रामकाठी शिवारात दीपक याला बोलावून घेतले. आरोपीने दीपक याच्या डोक्यात, मानेवर धारदार कोयत्याने वार करून खून केला. कोयता जागीच टाकून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.घटनास्थळी सासवड उपविभागिय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौड, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करीत आहेत. आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना मृत दीपक जगताप हा घरी न आल्याने आणि त्याचा मोबाइल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपक याचा मृतदेह आढळला. घटनास्थळावर दीपक आणि आरोपी सुशांत यांच्या दुचाकी आढळल्या. याबाबतची फिर्याद दीपक याचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी) यांनी जेजुरी पोलिसांत दिली आहे. पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार केली आहे. आरोपी मापारी यांचा कसून शोध घेत आहेत.