मकासार (इंडोनेशिया): इंडोनेशियातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘समुद्री व्यवहार आणि मत्स्यपालन मंत्रालया’चे ATR 42-500 हे विमान मकासार विमानतळाजवळ रडारवरून गायब झाले असून, बुलू साराउंग पर्वताच्या रांगांमध्ये या विमानाचे अवशेष सापडले आहेत. या विमानात एकूण ११ जण स्वार होते, ज्यामध्ये ८ कर्मचारी आणि ३ प्रवाशांचा समावेश आहे. रडारवरून अचानक झाले गायब ‘फ्लाइट रडार २४’ (FlightRadar24) ने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान समुद्रावरून अत्यंत कमी उंचीवरून उड्डाण करत होते. त्यामुळे रडार कव्हरेजमध्ये अडचणी येत होत्या. मकासार विमानतळापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असताना, दुपारी १:१७ वाजता (स्थानिक वेळ) या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्क तुटला. रडारवर शेवटचे सिग्नल मिळालेली वेळ ०४:२० UTC नोंदवण्यात आली आहे. डोंगरमाथ्यावर जळता ढिगारा आणि धुक्याचे साम्राज्य सोशल मीडियावर या घटनेचे काही हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बुलू साराउंग पर्वताच्या शिखराजवळ विमानाचा ढिगारा जळताना दिसत आहे. दाट धुके आणि खडकाळ प्रदेश असलेल्या या भागात विमानाचे अवशेष विखुरलेले पाहायला मिळत आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले स्थानिक नागरिक आग विझवण्याचा प्रयत्न करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू मकासार येथील शोध आणि बचाव संस्थेचे (SAR) प्रमुख अँडी सुल्तान यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, मदत पथके तातडीने दुर्घटनास्थळाकडे रवाना करण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र, खराब हवामान आणि डोंगराळ भागामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. विमानाने हवेत असताना शेवटचे रूट निर्देश स्वीकारले होते, त्यानंतर काही क्षणांतच ते बेपत्ता झाले. या अपघातात किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून पूर्ण माहिती बचाव मोहीम पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.