अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनाचा राजसदरेवर ऐतिहासिक ठराव

सातारा (प्रतिनिधी) – सातारा पालिकेच्या इतिहासात प्रथमच विशेष सभा ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर मंगळवारी घेण्यात आली. अजिंक्यतारा किल्ल्यावरील इमारती आणि वास्तूंच्या विकासाचा आराखडा करण्याचा ठराव “स्वाभिमान दिना’निमित्त एकमताने मंजूर करण्यात आला.
ज्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर ऐतिहासिक निर्णयांची नांदी झाली, तेथे पालिकेची विशेष सभा दिमाखात झाली. या किल्ल्याच्या संवर्धनाचा आराखडा तयार करून तो नगरविकास विभागाकडे पाठवण्यात येईल. हा ठराव एकमताने मंजूर करण्याची विनंती असे साविआचे स्वीकृत नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांनी केली.
छ. शाहू महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून सातारा शहराची स्थापना केली. दि. 12 जानेवारी रोजी त्यांचा किल्ले अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक झाला होता. शिवराज्याभिषेक समितीच्यावतीने दरवर्षी हा दिवस स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पालिकेची विशेष सभा प्रथमच अजिंक्यताऱ्याच्या राजसदरेवर झाली. सर्वप्रथम छ. शाहू महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, सभापती व नगरसेवकांनी अभिवादन केले. त्यानंतर सभेला सुरुवात झाली.
सभा सचिव हिमाली कुलकर्णी यांनी अजिंक्यतारा किल्ल्याच्या संवर्धनाचा विषय मांडला. यावर ऍड. बनकर म्हणाले, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा तयार केला आहे. तसाच आराखडा अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनासाठी केला जाईल. या किल्ल्याचे सुशोभिकरण, तेथील तळी, मंदिरे यांचेदेखील संवर्धन केले जाईल. हा किल्ला पूर्वी पालिकेच्या हद्दीत नसल्याने विकासा करण्यात अडचणी होत्या. हद्दवाढीने या अडचणी दूर झाल्या आहेत.
पालिकेच्या अंदाजपत्रकात किल्ल्यासाठी विशेष निधीची तरतूद केली जाईल. नगरसेवक शेखर मोरे-पाटील म्हणाले, किल्ल्याचे संवर्धन करतानाच पथदिव्यांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा. विकासकामे करायची झाल्यास प्रथम रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. किल्ल्याच्या उर्वरित रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे, अशी अपेक्षा स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे यांनी व्यक्त केली. नगरसेवक निशांत पाटील म्हणाले,
अजिंक्यतारा किल्ल्यामुळे साताऱ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्याचा विकास व्हावा, ही सर्वांची भावना आहे. मतभेद विसरून आपण सर्व जण किल्ल्याच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करूया. ते नक्कीच भरघोस निधीची तरतूद करतील. यानंतर किल्ल्याच्या विकास आराखड्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
बांधकाम समितीच्या सभापती सिद्धी पवार, नियोजन समितीच्या सभापती स्नेहा नलवडे, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सीता हादगे, नगरसेवक किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, राजू भोसले उपस्थित होते.





