उरुळी कांचनमधील 400 कुटुंबांना मदतीचा हात

सोरतापवाडी (वार्ताहर) – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते सव्वादोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहे. त्यांचे यापुढे हाल होवू नये म्हणून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील 400 कुटुंबांना जानाई डेव्हलपर्स व अंबिका ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक सागर पोपटराव कांचन पाटील व मयूर पोपटराव कांचन पाटील मित्र परिवाराच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला.
उरुळी कांचन येथील बाजार पेठ, सराफ आळी, गुल आळी, महादेव नगर, लोखंडे नगर पूर्ण गावठाणामध्ये व परिसरातील सोशल डिस्टन्सचे पालन, मास्क व स्वच्छते बाबतचे सर्व निकष पूर्ण करीत अतिशय शिस्तबद्धपणे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या उपस्थितीत 400 कुटुंबाना किराणा व अन्न धान्याचे वाटप शनिवारी (दि.30) करण्यात आले. या किराणा किटमध्ये 10 किलो तांदूळ, सात किलो गहू, 1 किलो बेसन, 1 किलो तेल, मीठ, मसाला, 2 नग साबण, 1 किलो तूरडाळ व कड धान्य अशाप्रकारे एक ते दीड महिना पुरेल एवढे किराणा मालाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक किराणा किट सोबत 2 टी-शर्ट अशा प्रकारे 800 टी-शर्ट देण्यात आले.
लॉकडाऊन सुरू झाल्या पासून उरुळी कांचनमधील रहिवाशांना व व्यापारी वर्ग व कर्मचाऱ्यांना 2000 सॅनिटायझर बॉटल, परिसरातील वाड्यावस्तीवरती जाऊन जवळपास 1800 गरजू कुटुंबाना अन्न धान्य व किराणा मालासोबतच प्रत्येक कुटुंबाना एकूण 4000 टी-शर्टचे वाटप करण्यात आले. त्याचकाळात गावातील भटके व गोरगरीब लोकांना सत्यविनायक ग्रुप दातार कॉलनी यांच्या वतीने रोज 200 लोकांना 2 महिने जेवण पुरवण्यात आले. या काळात काम करत असताना संदीप गव्हाणे यांच्या वतीने जानाई डेव्हलर्पसच्या वतीने हॅंड बॅग देण्यात आल्या. रमजान ईदच्या वेळी मुस्लीम बांधवाना शिरखुरमा बनविण्यासाठी लागणारे आवश्यक असलेल्या वस्तूचे किट बनवून वाटप करण्यात आले. अशाप्रकारे सागर पोपट कांचन यांनी 10 स्वयंसेवक स्वखर्चातून नेमून लॉकडाऊन काळात गावामध्ये गर्दी टाळण्यासाठी वाड्या-वस्ती, सोसायटीमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे नियोजन केले असून ते आजही सुरू आहे.





