रेडा -सध्या जगभर करोनाने हातपाय पसरले आहेत. अनेक राजकीय नेते करोनाची गुणगुण लागताच लॉकडाऊन झाले आहेत. इंदापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याची पक्षाने दिलेली जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार पार पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम व पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे संकटाच्या कालावधीत देखील गावागावात भेट देत, नागरिकांना अन्नधान्य वाटप करत आहेत. त्यामुळे नागरिकांना लॉकडाऊनमध्ये आधार मिळत आहे.
राज्यातील अनेक राज्य व कॅबिनेट मंत्री करोना परिस्थितीमध्ये बाहेर पडायला तयार नाहीत, मात्र सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे हे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून समस्या सोडवण्यासाठी जनतेमध्ये राहिलेले दिसत आहेत. पालकमंत्री झाल्यापासून दत्तात्रय भरणे हे सोलापूरमध्ये जाऊन विविध प्रशासकीय विभागातील कामाचा आढावा घेत प्रशासन सज्ज करत नागरिकांना घ्यावयाची काळजी, खबरदारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरकरांना सांगितली.
एवढेच नव्हे तर डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वतः जाऊन स्वागत करुन आभार मानले. त्यामुळे प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे. इंदापूर तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवत तालुक्यात करोना शिरकाव होऊ नये, यासाठी ते रात्रंदिवस मेहनत घेत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी ते अत्यंत संयमाने पार पाडताना दिसत आहेत.