करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील मदतीचा हा पुढे केला आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप कोविड-19 च्या टेस्ट किटसाठी पैसे जमा करत आहे. त्यासाठी त्याने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मिळालेल्या ट्रॉफीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. या लिलावातून मिळणारे पैसे तो कोविड-19 च्या टेस्ट किटसाठी देणार आहे. याची माहिती त्याने ट्विटरद्वारे दिली आहे.
अनुराग कश्यपला “गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, पण सध्या देशातील परिस्थिती पाहता अनुरागने त्याच्या ट्रॉफीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. त्याच्या या निर्णयाची सोशल मीडियावर प्रशंसा होत आहे.
अनुराग पाठोपाठ कॉमेडियन कुणाल कामरा आणि वरुण ग्रोवर यांनी देखील त्यांचे यू-ट्युब बटण आणि ट्रॉफीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या कलारांना 30 दिवसांमध्ये 13 लाख 44 हजार रुपये कोविड-19 च्या टेस्ट किटच्या खरेदीसाठी जमा करायचे आहेत.