लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने गरिबांसाठी मदतीचा हात पुढे केल्याचे मोदींनी सूचित केले. गरीब कल्याण योजनेंतर्गत 1.75 लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. मागील 3 महिन्यांत 20 कोटी गरीब कुटूंबांच्या जनधन खात्यांमध्ये 31 हजार कोटी रूपये जमा करण्यात आले. त्याशिवाय, 9 कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांमध्ये 18 हजार कोटी रूपये जमा करण्यात आले. ग्रामीण भारतातील जनतेला रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी 50 हजार कोटी रूपयांची योजना हाती घेण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बल्गेरियाच्या पंतप्रधानांना दंड
भाषणात नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता एका देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख केला. त्या पंतप्रधानांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गेल्याने 13 हजार रुपये इतक्या रकमेचा दंड ठोठवण्यात आला, असे मोदी म्हणाले. दंड झालेले हे आहेत बल्गेरियाचे पंतप्रधान बॉयको बोरिस्कोव्ह. एका चर्चला दिलेल्या भेटीवेळी बॉयस्को बोरिस्कोव्ह यांनी मास्क घातला नव्हता.
आपल्याच सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना 300 लेव्ह्ज (बल्गेरियन चलन) म्हणजे अंदाजे 13 हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला. ही बातमी गेल्या आठवड्यात म्हणजे 24 जून रोजी स्थानिक वर्तमानपत्रात आली होती.