प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शेतात ऊस तोडणी सुरू असताना एका ऊसतोड कामगाराच्या चार वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक कपूरचंद गोविंद जाधव याच्यावर शिक्रापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरमले वस्तीवर सध्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या वास्तव्यास आहेत. सकाळी कामगार ऊस तोडणीसाठी शेतात गेले असताना लहान मुले झोपड्यांजवळ होती. यावेळी कपूरचंद जाधव हा आपला एमएच १९ डीव्ही ०४८४ ट्रॅक्टर मागे घेत होता. त्यावेळी झोपडीसमोर खेळत असलेली आरोही खैरनार ही चार वर्षांची मुलगी ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत मुलीचे वडील विजय भीमराव खैरनार (मूळ रा. माळशेवगी, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंदवला असून, पोलीस हवालदार किशोर तेलंग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.