स्वतःचे फोटो ‘रेमिनी’ सारख्या अॅप्सच्या मदतीने थोडे कुरूप करून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करणार्यांची संख्या वाढत आहे. ही कुरूपता स्वीकारण्याच्या दिशेने असलेली योग्य वाटचाल आहे का? काही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर इन्स्टाग्राम तसेच फेसबुकमधील छायाचित्रात अति सुंदर दिसतात. परंतु, दैनंदिन जीवनात, रस्त्यावरून चालताना हेच लोक दिसले, तर ते बिलकुल आकर्षक वाटत नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, व्हर्च्युअल जगातील फोटोत दिसणारा ताजातवाना, तरुण आणि टवटवीत चेहरा खर्या जगात वेगळाच वाटतो. मग यांच्या व्हर्च्युअल सुंदरते मागचे गुपित आहे तरी काय? फोटो किंवा व्हिडिओमध्ये ही सुंदरता येते इमेज फिल्टर अॅपद्वारे. फिल्टर अॅप्सच्या मदतीने फोटोत शरीर सडपातळ दाखवता येते. डोळे हिरवे, तपकिरी किंवा निळे होऊ शकतात. अगदी कातडीवरील सुरकुत्या एडिट करून काढून टाकता येतात. एका अंदाजानुसार, 600 दशलक्षांपेक्षा जास्त वापरकर्ते त्यांची छायाचित्रे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यापूर्वी फिल्टर वापरून एडिट करतात. त्यांची स्वतःला अधिक सुंदर दाखविण्याची, फॉलव्हर्स वाढविण्याची शर्यत सुरू असते. पण, वारंवार सुंदर, अट्रॅक्टीव्ह फोटो पाहिल्याचे नकारात्मक प्रभाव आहेत. ऑस्ट्रेलियन संशोधक झो ब्राउन आणि मारिका टिगेमन यांनी केलेल्या अभ्यासात हे परिणाम शक्य तितक्या सोप्या पद्धतीने मांडले आहेत. ‘अट्रॅक्टीव्ह सेलिब्रिटी अँड पीअर इमेजेस ऑन इन्स्टाग्राम: इफेक्ट ऑन वुमेन्स मूड अँड बॉडी इमेज,’ या शीर्षकाचा त्यांचा संशोधन लेख सायन्स डायरेक्ट जर्नलमध्ये प्रकाशित झाला. यात मांडलेल्या मुद्द्यांप्रमाणे, स्त्रिया आणि मुलींनी इन्स्टाग्रामवर वारंवार सुंदर, अट्रॅक्टीव्ह लोकांची छायाचित्रे पाहिल्याने सामाजिक तुलनेची भावना निर्माण होते. यामुळे आत्मविश्वास गमावून स्वतःच्या शरीराबाबत कमीपणा देखील वाटू शकतो. सुदैवाने, हळूहळू वारे दिशा बदलत आहे. अनेक देशांत सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये फोटोत सुंदर दिसण्याऐवजी कुरूप बनविणारे फिल्टर अॅप्सची लोकप्रियता कमालीची वाढत आहे. असेच एक अॅप ‘रेमिनी’ सध्या चर्चेत आहे. कुरूपता स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल अॅप आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञाचा वापर करून क्ले फिल्टर स्टाइल प्रतिमा (इमेजेस) तयार करते. प्रतिमांमधील क्ले फिल्टर स्टाइल चेहरे काहीसे विचित्र, कुरुप पण गोंडस दिसतात. हे फिल्टर चेहर्यावरील वैशिष्ट्ये तशीच ठेवून प्रतिमा अधिक रंगीत आणि अतिशयोक्तीपूर्ण बनवते. वापरकर्त्यांना त्यांचा चेहरा व शरीर फोटोत मातीच्या शिल्पासारखे देखील प्रोजेक्ट करता येते. या अॅपची लोकप्रियता आहे तरी किती? वापरण्याकरिता मोफत असलेल्या, तसेच सर्वाधिक डाउनलोड झालेल्या अॅप्सच्या यादीत ‘रेमिनी’ अॅपने गेल्या तीन महिन्यांपासून टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. रेमिनी अॅपचा वापर सध्या जगभरात 100 दशलक्षपेक्षा अधिक लोक करतात. रेमिनीची पालक कंपनी मिलान, इटली येथील ‘बेंडिंग स्पून्स’ आहे. याचा सर्वात जास्त वापर चीनमध्ये होतो. शाहुंगशू हे चीनमधील इन्स्टाग्रामसारखे समाज माध्यम आहे. सध्या शाहुंगशूवर सर्वाधिक लाइक्स मिळतात ती अनेकांनी शेअर केलेल्या ‘रेमिनी’च्या माध्यमातून बनविलेल्या क्ले-शैलीतील प्रतिमांना. तोच तोच पणा झाला नकोसा एआय फिल्टर अॅप्सने एडिट केलेले थोडेसे कुरूप पण गोंडस फोटो पाहून समाज माध्यमांवर लोकांना आनंद का होतो? याचे उत्तर बीजिंगच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्समधील मानसशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक, डू डोंगुई यांनी दिले. अनेक वर्षे लोक ब्यूटीफिकेशन फिल्टर वापरून स्वतःला अधिक सुंदर भासविणार्या सेल्फी तसेच इतर छायाचित्र सोशल मीडियात पोस्ट करताहेत. हे सुरकुत्या नसणारे, एकसारखे गोरेपान चेहरे पाहून लोक कंटाळलेत. यात आता काही नावीन्य राहिले नाही. याउलट, क्ले फिल्टरचे रंग लोकांना साधेपणाकडे परत नेतात. थोडे अॅनिमेशन असल्याने बालपणाच्या आठवणी ताज्या होतात. एकंदरच, याचा मनावर देखील चांगला परिणाम होतो, असे डोंगुई म्हणतात. सौंदर्य हे पाहणार्याच्या डोळ्यात असते, ही म्हण सत्यच आहे. प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसते आणि त्याच्या किंवा तिच्या चेहर्यावरील सुरकुत्या, फोड आणि पिंपल्स, देखील एकूण सौंदर्याचा भाग असतात. याला सांस्कृतिक दृष्टिकोन देखील आहे. स्टीफन बेली यांनी त्यांच्या ‘अग्ली: द एस्थेटिक्स ऑफ एव्हरीथिंग’ या पुस्तकात असे सुचवले आहे की, व्यक्तीतील थोडीशी कुरूपता ही सौंदर्यापेक्षा अधिक विविधता दर्शविणारी आणि आश्चर्यचकित करणारी ठरू शकते. त्यामुळे अशा किरकोळ दोषांबद्दल लोक काय म्हणतील याचा विचार करणे थांबवायला हवे. त्वचेवर कुठे डाग असतील तर त्यात काही कमीपणा वाटण्यासारखे नाही. साइज ‘झीरो फिगर’ व स्पॉटलेस ब्युटीचा नाद सोडून स्वतःचे खरे सौंदर्य स्वीकारायाला हवे. ‘रेमिनी’ सारख्या अॅप्सची वाढती लोकप्रियता ही कुरूपता स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल असल्यासारखे आहे.