पुणे : आदर फाउंडेशन आणि खजिना विहीर मित्र मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून वारकऱ्यांसाठी नुकतेच एक मोठे आरोग्य सेवा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ५०० पेक्षा जास्त वारकऱ्यांनी औषधोपचार, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि तंबाखू-मुक्ती समुपदेशन यांसारख्या सुविधांचा लाभ घेतला. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, श्री गोविंद बेडेकर आणि श्री कासार यांच्या हस्ते विठ्ठल पूजनाने शिबिराची सुरुवात झाली. या शिबिरात ५० हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. गेल्या दोन वर्षांपासून आदर फाउंडेशन आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहे. घरेलू कामगार महिलांसाठी रक्तक्षय तपासणी, अनाथालये आणि महानगरपालिका शाळांमध्ये जागरूकता सेमिनार आणि वारकरी आरोग्य शिबिरासारखे उपक्रम फाउंडेशन राबवत आहे. सध्या फाउंडेशनमध्ये ८० पेक्षा जास्त वैद्यकीय विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील स्वयंसेवक कार्यरत आहेत. खजिना विहीर तरुण मंडळाच्या सहकार्याने गेल्या वर्षी आणि यंदा हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. पुढील काळात पुण्याच्या ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा देण्याचा फाउंडेशनचा संकल्प आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा १३ ऑगस्ट (जागतिक अवयवदान दिन) पासून आदर फाउंडेशनने १,००० हून अधिक अवयवदात्यांची नोंदणी करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम समाजात अवयवदान आणि आरोग्य सेवांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आदर फाउंडेशनच्या या कार्याला सर्वत्र कौतुक मिळत आहे.