Zapurza’s 4th Anniversary: पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या झपूर्झा – आर्ट अँड कल्चर म्युझियम तर्फे चौथ्या वर्धापनदिनानिमित्त १६ ते २४ मेदरम्यान भव्य “कला महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले आहे. खडकवासला बॅकवॉटर परिसरातील कुडजे येथे होणाऱ्या या महोत्सवात भारतीय कला, संस्कृती आणि परंपरेचा बहुरंगी आविष्कार अनुभवायला मिळणार आहे. निसर्गरम्य वातावरण, हिरव्यागार डोंगररांगा आणि शांत जलाशयाच्या सान्निध्यात वसलेले झपूर्झा हे कला, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम अनुभवण्याचे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या चार वर्षांत पुणेकर रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे झपूर्झाने स्वतंत्र सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून आपली छाप निर्माण केली आहे. या महोत्सवाची सुरुवात १६ मे रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत फोयर १ येथे होणाऱ्या “भरतम” या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील भाव, ताल आणि मुद्रांचा सुरेख आविष्कार या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. १७ मे रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत “नृत्यदर्शनम्” कार्यक्रम रंगणार असून भरतनाट्यम आणि कथक या अभिजात नृत्यशैलींचे सादरीकरण होणार आहे. १९ मे रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ऑडिटोरियममध्ये “कुचीपुडी लहरी” कार्यक्रमाद्वारे अभिनय, लय आणि नृत्यसौंदर्याचा संगम अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे २४ मे रोजी दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत “कठपुतली” हा लोककला प्रयोग सादर केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत “नासदीय सूक्तम्” या वेदकालीन संकल्पनांवर आधारित कथक प्रस्तुती होणार आहे. रंगीबेरंगी वेशभूषा, संगीत आणि कथानकामुळे हे कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षण ठरणार आहेत. झपूर्झा तर्फे भारतीय कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह तरुण पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा उपक्रमही या माध्यमातून राबविला जात आहे. कला, संस्कृती आणि निसर्गाचा संगम अनुभवण्यासाठी हा महोत्सव पुणेकरांसाठी एक विशेष सांस्कृतिक पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.