Solapur: आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी युगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे एक प्रेरणादायी उदाहरण सोलापूरमध्ये समोर आले आहे. आळंदीहून आलेल्या एका महिलेने आपल्याला सापडलेले सोन्याचे दागिने कोणत्याही मोहाशिवाय त्याच्या मूळ मालकाला परत करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. नेमकी घटना काय? ज्ञानेश्वरी विठ्ठलदास गुट्टे या महिला आपल्या ननंद भाग्यश्री फड आणि नणंदोवा ज्ञानेश्वर फड यांच्यासह सोलापूरच्या एस. एस. बलदवा रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. रुग्णालयाच्या बाहेर त्यांना जमिनीवर १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर सापडले. ज्ञानेश्वरी यांनी तत्काळ आसपास चौकशी केली, मात्र मालकाचा शोध लागला नाही. असा शोधला दागिन्यांचा मालक सापडलेले दागिने स्वतःकडे न ठेवता ज्ञानेश्वरी यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला. रुग्णालय प्रशासनाच्या मदतीने ‘पेशंट रजिस्टर’ तपासण्यात आले आणि त्याआधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात आला. हे दागिने निर्मला रेवणसिद्ध यावलकर आणि रेवणसिद्ध सोमनाथ यावलकर यांचे असल्याचे निष्पन्न झाले. मालकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दागिने हरवल्यामुळे यावलकर कुटुंब अत्यंत चिंतेत होते. मात्र, ज्ञानेश्वरी गुट्टे यांनी योग्य पडताळणी करून त्यांचे दागिने सुखरूप परत केले. हरवलेले दागिने परत मिळाल्यामुळे यावलकर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत ज्ञानेश्वरी गुट्टे यांच्या प्रामाणिकपणाचे भरभरून कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.