satara | कोरेगावात आज किसान सन्मान योजनेसाठी शेतकर्यांचा मेळावा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील शेतकर्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये देत असून, सदरची रक्कम जमा होत नसल्याने शेतकर्यांच्या तक्रारींचे निराकारण करण्यासाठी कोरेगाव पंचायत समिती सभागृहामध्ये सोमवार, दि. २४ जून रोजी सकाळी १० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिली.
राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या बँक खात्यावर दरवर्षी जुलै, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये समान हप्त्यात जमा केली जाते.
या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी यांच्या भूमि अभिलेख नोंदणी, ई-केवायसी, बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक शेतकर्यांच्या याबाबत तक्रारी असून, ते अनुदानापासून वंचित राहत आहेत.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा होणार असून, यावेळी भूमि अभिलेख नोंदणी, ई-के. वाय. सी., बँक खाते व आधार कार्ड संलग्न करणे आदी तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.
कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे व आपल्या अडचणींचे निराकारण करुन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.





